ओला पाठोपाठ उबरच्या टॅक्सी चालकांनीही संप मागे घेतला आहे. मनसेच्या वाहतूक शाखेने संप मिटल्याची घोषणा केली. मनसेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला होता. घाटकोपर येथील चिराग नगर पोलीस स्थानकात गुरुवारी दुपारी मनसेचे नेते आणि उबरच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ज्या चालकांना काळया यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेणे तसेच अन्य मागण्यांवर उबरच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असे मनसेच्या वाहतूक शाखेचे नेते संजय नाईक यांनी सांगितले.

ओलाच्या चालकांनी बुधवारी संध्याकाळी संप मागे घेतला. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अॅपबेस टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला आणि उबर या दोन्ही कंपन्या अल्पावधीत महत्वपूर्ण ठरल्या आहेत. एकटया मुंबईमध्ये ४५ हजारपेक्षा जास्त अॅप बेस टॅक्सी चालतात असा अंदाज आहे. संप मिटल्यामुळे मुंबईकरांना दिलासा नक्कीच मिळेल. या संपामुळे रोजची ओला-उबरने कामावर जाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली होती.

Story img Loader