रेल्वे मार्गात नालेसफाईची कामे एप्रिलपासून मोठय़ा प्रमाणात झाली असून मेगाब्लॉकच्या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी ‘कचरा विशेष’ गाडी चालवून रेल्वे मार्ग स्वच्छ ठेवण्यात आल्याचा मध्य रेल्वेचा फुकाचा दावा शुक्रवारच्या पहिल्याच पावसाने उधळून लावला. मात्र तरीही अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मुंबईकरांच्या माथी मेनलाइनवर पाच तास तर हार्बर मार्गावर चार तास मेगाब्लॉक आहे.
शुक्रवारी पडलेल्या पहिल्याच पावसाने कुर्ला ते मुलुंड वाहतूक पार कोलमडली होती. मध्य रेल्वेवर याच टप्यात जास्त नाले असून त्यांची नियमित सफाई झाली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शुक्रवारी मध्य रेल्वेचे हे दावे फोल ठरले. कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, कांजुरमार्ग, भांडुप येथील नाले कचऱ्यासहीत भरून वाहत होते. मेगा ब्लॉकच्या काळात अभियांत्रिकी कामाला जोडून सफाई आदी कामेही होतात, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष तसे झाल्याचे रेल्वे मार्गावर कुठेही नजरेस पडलेले नाही. मध्य रेल्वेतर्फे दरदिवशी गाडय़ांच्या वेळा किती टक्के पाळल्या गेल्या हे जाहीर करण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी फक्त २४ टक्के उपनगरीय फेऱ्या वेळापत्रकीय वेळेनुसार धावल्या.
स्वच्छतेबाबत केवळ दावे करणाऱ्या मध्य रेल्वेने रविवारी, ९ जून रोजी माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ असा पाच तासांचा तर हार्बर मार्गावर कुर्ला-मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेने सकाळी ११ ते दुपारी तीन असा चार तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. या काळात केवळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरचे काम होणार आहे. माटुंगा-मुलुंड दरम्यान ठाण्याच्या दिशेची जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून सीएसटीकडे येणाऱ्या जलद मार्गावरील गाडय़ा त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबविण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात येणार असून या काळात सीएसटी ते पनवेल वाहतूक मेन लाइनने ठाण्यापर्यंत आणि तेथून ट्रान्स हार्बरमार्गे सुरू राहणार आहे. मेन लाइनच्या जलद मार्गावरून ही वाहतूक सुरू असेल, असे सूत्रांनी सांगितले.
आजचा मेगाब्लॉक :
माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर सकाळी १०.१५ ते ३.१५
कुर्ला ते मानखुर्द मार्ग ११ ते ३ पूर्ण बंद, वाहतूक ठाणेमार्गे.