मुंबई : वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीतील घरात शिरून अभिनेता सैफ अली खानवर चोराने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता याच परिसरात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. वांद्रे येथील रिक्लेमेशन परिसरातील इमारतीमधील सदनिकेत ६४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. महिलेचे हात, पाय बांधून शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकावर संशय असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरून चोराने त्याच्यावर सहा वार केल्याची घटना ताजी असतानाच आता वांद्रे परिसरातील रिक्लेमेशन डेपो परिसरातील कांचन इमारत क्रमांक १३ मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत ६४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. ओढणीने महिलेचे हात, पाय बांधून शस्त्राने त्यांचा गळ्यावर वार करण्यात आला आहे. चार – पाच दिवसांपूर्वीच महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. रेखा अशोक खोंडे असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह भाभा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रिक्लेमेशन गेट क्रमांक दोन येथील कांचन इमारत क्रमांक १३ ए विंगमधील २२ क्रमांकाच्या सदनिकेत महिलेचा मृतदेह सापडला.

घरातील सर्व वस्तू व दरवाजाची पाहणी केली असता आरोपी घरात जबरदस्तीने शिरलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी महिलेच्या परिचित व्यक्तीचाच सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या माहितीच्या आधारे महिलेच्या एका नातेवाईकाला संंशयावरून वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. भाभा रुग्णालयतील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा आहेत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून महिलेची हत्या करण्यात आलेल्या शस्त्राची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस व गुन्हे शाखेचे पथकही तपास करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.