शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोरच्या जीवनावर एक वेब सीरिज बनवण्याच्या तयारीत आहे. याबाबत प्रशांत किशोर शाहरुख खानला त्याच्या मन्नत बंगल्यावर सायंकाळी ७ वाजता भेटू शकतात. या प्रोजेक्टसाठी प्रशांत किशोरने अद्याप होकार दर्शविला नसल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान, राजकारणानंतर प्रशांत किशोर कला क्षेत्रात सुद्धा रणनीती आखणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतरही प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विरोधकांकडून २०२४ मध्ये भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे.
हेही वाचा – शरद पवार – प्रशांत किशोर भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये झालेली ही भेट महत्वाची मानली जात आहे. प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, जगनमोहन रेड्डी, कॅप्टन अमरिंगर सिंग, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी रणनीतीकार म्हणून काम केलं आहे.