विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली. अतिशय ऐतिहासिक अशी ही मिरवणूक निघालेली पाहून सर्वचजण भारावून गेले. मात्र या मिरवणुकीनंतर आता त्याठिकाणी जमलेल्या कचऱ्याचेही फोटो समोर आले आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काही तासांत स्वच्छ केलेला परिसरही सर्वांनी पाहिला. ४ जुलैच्या रात्री मिरवणूक आटोपल्यानंतर चपला आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच मरीन ड्राईव्ह परिसरात पाहायला मिळाला. मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना ११,५०० किलोंचा कचरा या परिसरातून उचलला असल्याची माहिती दिली आहे.
द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी वृत्त दिले आहे. मुंबई मनपाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी (दि. ४ जुलै) मोठ्या प्रमाणात चाहते मरीन ड्राईव्ह परीसरात जमले असल्यामुळे काल सायंकाळी साफसफाई करण्यात अडचण निर्माण होत होती. रात्री सुरू केलेली स्वच्छता मोहीम सकाळी ८ वाजता संपली. कचरा वाहून नेण्यासाठी एक डम्पर आणि पाच एससीबी व्हॅन आणण्यात आल्या होत्या. तसेच बराच कचरा लहान वाहनात भरून नेला. या कचऱ्याचे वजन फार नव्हते. पण त्याची संख्या अधिक होती.
सकाळी मरीन ड्राईव्हवर चालण्यासाठी अनेक स्थानिक नागरिक येत असतात त्यांच्या येण्याच्या आधीच रात्रभर स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. यासाठी मुंबई मनपाच्या १०० कर्मचाऱ्यांसह एका स्वंयसेवी संस्थेचे २५ स्वंयसेवक सहभागी झाले होते.
क्रिकेट चाहत्यांनी कोणता कचरा केला?
विजयी मिरवणूक संपेपर्यंत चाहत्यांनी मरीन ड्राईव्हवर प्लास्टिक बाटल्या, खाण्याच्या पदार्थांचे रॅपर्स, कागदी कप, कागद, कपड्यांपासून ते चपलांपर्यंतच्या वस्तू टाकल्या होत्या. चाहत्यांची अलोग गर्दी झाल्यामुळे अनेकांना आपल्या चपला गर्दीतच गमवाव्या लागल्या. चाहत्यांची गर्दी कमी झाल्यानंतर मुंबई मनपाने वेळ न घालवता रात्री ११.३० वाजता स्वच्छता मोहीम सुरू केली.
सूर्यकुमारचं विधीमंडळात मराठीत भाषण; आमदारांनी केला “सूर्या, सूर्या..” जयघोष
नेटीझन्सकडून मनपाचे कौतुक
मरीन ड्राईव्हवर सकाळी सकाळी चालण्यासाठी आलेल्यांनी जेव्हा परीसरातील स्वच्छता पाहिली, तेव्हा त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. एक्सवर वैभव कोकाट यांनी मिरवणुकीच्या रात्री झालेल्या कचऱ्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. “विश्वचषकाचा आनंद साजरा करण्यासाठी इथे आलेले चाहते सकाळी झोपेतून उठण्याआधीच मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता केलेली असेल. स्वच्छता कर्मचारी रात्रभरात हा परिसर स्वच्छ करतील, यात शंकाच नाही”, असे त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले.
“आपली विकेट तर जाणार नाही ना?”, काल मुंबईत झालेल्या गर्दीवर बोलताना फडणवीसांचं मोठं विधान
सरकार आणि खेळाडूंकडून मात्र अनुल्लेख
विश्वचषक विजेत्या संघासाठी बीसीसीआय आणि महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच विजयी मिरवणुकीचे योग्य व्यवस्थापन केल्याबद्दल मुंबई पोलिसांचेही सर्वांनी आभार मानले आहेत. आज विधीमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित शर्मा, सुर्यकुमार यादवने मुंबई पोलिसांचे आभार मानले. मात्र एका रात्रीत मरीन ड्राइव्हचा परिसर स्वच्छ करणाऱ्या मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या मात्र साधा उल्लेखही झाला नाही.