तेलंगण राज्याच्या निर्मितीचा निर्णय होताच स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. शिवसेनेने महाराष्ट्राचे तुकडे करण्यास विरोध दर्शविला असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेसचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत अनुकूल भूमिका घेतली.
शिवसेनेने मात्र स्वतंत्र विदर्भास ठाम विरोध केला. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अखंड महाराष्ट्राचे समर्थन केले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र विदर्भाचे समर्थनच केले. राज्याची सत्ता हस्तगत करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न असले तरी विदर्भातील ६२ जागा या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरतात. विदर्भ वेगळा झाल्यास २२६ जागांमधून सत्ता मिळविणे शक्य होईल, असे राष्ट्रवादीचे गणित आहे.  तेलंगणाच्या निर्णयानंतर स्वतंत्र विदर्भाची मागणी काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केली असली तरी स्वतंत्र राज्यासाठी तेलंगणाच्या धर्तीवर विदर्भात ठोस मागणी दिसत नाही. तसेच विदर्भ स्वतंत्र झाले तरी आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य होणार नाही, असा एक मतप्रवाह आहे.
भाजपचा पाठिंबा
केवळ स्वतंत्र विदर्भालाच नाही, तर छोटय़ा राज्यांच्या निर्मितीला भाजपचा पाठिंबा असून शिवसेनेशी या मुद्दय़ावर पूर्वीपासूनच मतभेद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले.
मुंडे यांनी छोटय़ा राज्यांची निर्मिती एनडीएच्या कारकीर्दीतच झाली असल्याचे नमूद केले. जांबुवंतराव धोटे आणि भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरला होता.दरम्यान, विदर्भ राज्याच्या मागणीसाठी चळवळ चालविणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याच्या उद्देशाने येत्या ५ ऑगस्टला नवी दिल्लीत संसद भवनाला घेराव घालण्याची घोषणा केली आहे.

Story img Loader