मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर लगेचच समाजमाध्यमांचे रूपांतर राजकीय रणभूमीत झाल्याचे दिसून आले. आचारसंहितेचे कोणतेही बंधन नसलेल्या समाजमाध्यमांवरून वेगवेगळय़ा प्रकारे मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न दिवसभर पाहायला मिळाले. त्यासाठी वापरण्यात येणारे अपशब्द, प्रक्षोभक विधाने, छायाचित्रे, चित्रफिती यांतून तीव्र विखार समाजमाध्यमांच्या पानोपानी उमटत होता.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी शनिवारी समाप्त झाली. रविवारी उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मतदानाच्या दिवशीच्या व्यूहरचनेची उजळणीही करण्यात आली. मात्र, त्याचवेळी समाजमाध्यमांवर प्रचाराचा जोर कैकपटीने वाढल्याचे दिसून आले. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स अशा सर्वच समाजमाध्यमांवरून आपल्या उमेदवाराचा वा पक्षाचा प्रचार करण्यापेक्षाही अधिक भर प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पक्ष यांची िनदानालस्ती करण्यावर असल्याचे दिसून आले. नेत्यांची बदललेली भूमिका, भाषणे, जुन्या चित्रफिती प्रसारित करून त्यांच्या दुटप्पीपणाकडे बोट दाखवण्याचे प्रकार सुरूच होते. मतदान केंद्रांवरील विशिष्ट समुदायाच्या पेहरावातील गर्दीची छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित करून अन्य समुदायांतील मतदारांना चिथावणी देणाऱ्या पोस्टचा दिवसभर धुमाकूळ होता. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या विशिष्ट भाषेतील पत्रकांची छायाचित्रे पसरवून त्याआधारे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न दिसून आले.
हेही वाचा >>>गेल्या ५० वर्षांत मुंबईकरांचा कौल एकाच पक्षाच्या बाजूने !
प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांनी काही वर्षांपूर्वी केलेली भाषणे आणि आताची बदललेली भूमिका यांच्या ध्वनिचित्रफिती शोधून त्या समाजमाध्यमांवर फिरवण्याच्या कामाला रविवारी दिवसभर वेग आला होता. वर्तमानपत्रांत छापून आलेल्या जुन्या बातम्या आणि आताची राजकीय परिस्थिती यातील विरोधाभास सांगून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी एकाही पक्षाने सोडली नाही.
मुंबई लक्ष्य
राज्यातील शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दहा मतदारसंघांसह नाशिक, धुळे आणि दिंडोरी या जागांवर मतदान होणार आहे. मात्र, रविवारच्या समाजमाध्यमांवरील विखारी प्रचाराचा केंद्रबिंदू मुंबई होता. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जुनी वाक्ये दोन्ही गटांकडून आपल्या सोयीनुसार वापरली गेली. मुखपत्रातील जुन्या बातम्यांची शीर्षके दोन्ही गटांनी वापरून मतदार, समर्थक, सहानुभूतीदारांना संभ्रमात टाकण्याचे कामही जोरात सुरू होते. जुनी बातमी दाखवून इतिहासाची पुनरावृत्ती होणार का असा सवाल केला जात होता. तर कुठे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तुलना करून सूचक संदेश दिला जात होता.
हेही वाचा >>>मतदारसंघाचा आढावा आणि नियोजनाबाबत चर्चा, मुंबईतील उमेदवारांचा रविवारी कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकांवर भर
आवाहनाच्या संदेशांचा भडिमार
गेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मुंबई महानगर क्षेत्रातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मोहीम राबवण्यात येत आहे. त्या मोहिमेप्रमाणेच राजकीय पक्षांकडूनही आपापल्या कार्यकर्ते, मतदार, पाठीराख्यांना आवाहन करणारे संदेश प्रसारित केले जात होते. राजकीय पक्षांकडून मतदानाचे आवाहन करतानाही राष्ट्रवाद, प्रादेशिक अस्मिता, पक्षनिष्ठा अशा मुद्दय़ांचाच आधार घेतला जात होता.
विखारी विधाने
समाजमाध्यमांवरच्या प्रचारात ‘हिंदू विरुद्ध मुस्लीम’, ‘मराठी विरुद्ध गुजराती-जैन’, ‘स्थानिक विरुद्ध उपरा’ असे शीतयुद्ध दिवसभर सुरू होते. पक्षांच्या अधिकृत फेसबुक पेजऐवजी अनामिक समर्थकांच्या माध्यमातून प्रचार, अपप्रचाराचे हल्ले सुरू होते. स्थानिक उमेदवार नसेल तर त्याला आपटा, अबकी पार अंतिम संस्कार, दुल्हा कौन है, महाबिघाडी, विकसित भारत, लोकशाहीची लढाई आदी शब्द रविवारी दिवसभर ट्रेंिडगमध्ये होते.
यंत्रणा मतदानाच्या तयारीत : राजकीय हल्ले-प्रतिहल्ल्यांनी समाजमाध्यमे युद्धभूमी बनली असताना त्यावर नियंत्रण ठेवणारी निवडणूक आयोगाची यंत्रणा दिवसभर सोमवारच्या मतदानाच्या तयारीत व्यग्र होती. त्यामुळे यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने निवडणूक अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, समाजमाध्यमांवरील प्रचाराबद्दल अधिकृतपणे तक्रारी आल्यानंतरच कारवाई केली जाते.