कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिक जल्लोष साजरा करत आहेत आणि राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भास्कर जाधव म्हणाले, “आम्ही आज सगळेच आनंदअश्रूंमध्ये न्हाऊन निघतोय. याचं कारण असं आहे की संजय राऊत हे आमचे नेते आहेत. एक लढवय्ये नेते आहेत, तत्वनिष्ठ नेते आहेत. आपल्या भूमिकेशी ठाम राहणारे नेते आहेत. हे नेते मागील चार-दोन वर्षे या देशात जो लोकशाहीवर घाला घातला जात होता. या लोकशाहीचं अधंपतन केलं जात होतं. या लोकशाहीच्या नावाने, सत्तेचा दुरुपयोग करून संपूर्ण देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू होतं, त्याविरोधा ते आपल्या लेखणीने प्रहार करत होते. त्यांना विविध प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते काही थांबवू शकले नाहीत आणि मग शेवटचा उपाय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. तुरुंगात टाकत असताना अतिशय खोट्या केसेस तयार केल्या, खोटे पुरावे तयार केले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. परंतु जेलमध्ये गेल्यानंतरही संजय राऊत हे दमले नाहीत, थकले नाहीत. कोणत्याही प्रकारे त्यांनी शरणागती पत्कारली नाही. किंबहूना ते अधिक ताकदीने उभा राहिले, हिंमतीने उभा राहिले.”

हेही वाचा – Sanjay Raut Bail Granted: मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर, पत्राचाळ प्रकरणी झाली होती अटक!

याशिवाय “ त्याचं एक उदाहरण मी सांगतो, २८ ऑगस्ट रोजी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी आणि आमचे खासदार अरविंद सावंत यांची नेतेपदी निवड केली. आम्हाला नेता म्हणून निवडलं. आज माझ्या डोळ्यातून पाणी येतय. त्याचवेळी संजय राऊत यांचं जेलमधून मला आणि अरविंद सावंत यांना पत्र आलं होतं. ज्या पत्राचा उल्लेख मी आजपर्यंत केला नाही, आजच ती योग्य वेळ आहे, त्या पत्रात संजय राऊत यांनी असं सांगितलं होतं. खोटे आरोप करून, खोटे गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये टाकलं आहे. आज शिवसेनाप्रमुखांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम झालं आहे. ४० आमदार फोडून शिवसेना संपवण्याचं काम झालं आहे. मी माझ्यापरीने त्याच्याविरोधात लढलो, तुम्ही तुमच्यापरीने लढता आहात. परंतु आज मी जेलमध्ये आहे. तुम्ही अशाप्रसंगामध्ये शिवसेनेची साथ सोडू नका. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हिंदत्वाच्या विचारांशी फारकत घेऊ नका. मी लवकरच तुरुंगातून बाहेर येईन आणि तुमच्यापढे या लढाई उतरेन.” असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

हेही वाचा – अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि रविंद्र चव्हाणांचा तातडीने राजीनामा घ्या, अन्यथा…; विद्या चव्हाणांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा!

याशिवाय “आज तो दिवस आला आहे. संजय राऊत हे जेलमधून बाहेर येणार आहेत आणि म्हणून त्यांनी पत्रात लिहिलं होतं. सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही हो सकता, आप लढते रहिए. म्हणून आज माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू आहेत. आनंदोत्सव आहे. आमचे नेते जेलमधून बाहेर पडले आहेत. अशापद्धतीने जे जे नेते जेलमध्ये आहेत, ते बाहेर पडतील आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी अशापद्धतीचं षडयंत्र रचलं. त्याविरोधात ते ताकदीने उभा राहतील.” असंही भास्कर जाधव यांनी यावेळी बोलून दाखवलं.

त्यांनी ते खरं करून दाखवलं, ते झुकले तर नाहीतच परंतु… –

“संजय राऊत जे म्हणाले की, मी झुकणार नाही. त्यांनी ते खरं करून दाखवलं. ते झुकले तर नाहीतच, परंतु अन्यायाच्या विरोधात या देशातील जनतेने कसं लढावं याचं एक उत्तम उदाहरण हे संजय राऊत यांनी आपल्या कृतीने तरुणांच्या समोर ठेवलेलं आहे. त्यांच्या घरी मी गेलो होतो, त्यांच्या मातोश्रींना, बंधूंना आणि त्यांच्या पत्नीला आणि मुलीलाही मी भेटलो. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर संजय राऊत जेलमध्ये गेले याची जराही खंत नव्हती. किंबहूना त्यांच्या मनात एक स्वाभीमानाची उर्मी होती. की आपला मुलगा शिवसेनेसाठी, सत्यासाठी आणि शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राच्या पाठीशी उभा राहून खंबीरपणे लढतोय याचा त्यांना अभिमान होता. ज्या लोकांनी त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांना मी एवढच सांगेन सावधान रहो शेर आ रहा है… माझी खात्री आहे संजय राऊत पूर्वीपेक्षा ताकदीने, उमेदीने झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोठी झेप घेतील, असं मला वाटतं.” असं म्हणत भास्कर जाधव यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the release of sanjay raut bhaskar jadhavs warning to the opponents msr
Show comments