मुंबई : मुंबई महानगरपालिकेने करोनाबाधातांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) कांदिवलीमधील रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. मात्र करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी मुंबई महानगरपालिकेने हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिला नव्हता. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णालय प्रशासनाने रुग्ण कक्ष परत मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला तीन वर्षांनी यश आले असून, सात दिवसांत हा रुग्ण कक्ष रुग्णालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी २०२०-२१ दरम्यान ईएसआयसीच्या कांदिवली रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. या रुग्ण कक्षात ६३ खाटा आहेत. या रुग्ण कक्षांमध्ये अनेक रुग्णांवर उपचारही करण्यात आले. मात्र करोना संपुष्टात आल्यानंतर हा रुग्ण कक्ष व त्यातील ६३ खाटा पुन्हा ईएसआयसीच्या ताब्यात देणे अपेक्षित होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने बंद केलेल्या करोना केंद्रातील साहित्य या रुग्ण कक्षांमध्ये ठेवले. त्यामुळे ईएसआयसी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना या कक्षात दाखल करताना रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. जागेअभावी अनेक रुग्णांना दाखल करून घेण्यास प्रशासनाला नकार द्यावा लागत होता. त्यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात होता. रुग्ण कक्ष परत मिळावा यासाठी रुग्णालय प्रशासनाने वारंवार मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाने ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत तातडीने कार्यवाही करून हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालयाला हस्तांतरित करण्याच्या सूचना पीयूष गोयल यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.
हेही वाचा…लुटीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेला आरोपी अटकेत
करोना महामारी संपली असून आपण आपल्या रुग्णालयाच्या नियमित रुग्ण कक्षाचा वापर करू शकता. रुग्ण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले साहित्य पुढील सात दिवसांत तातडीने हलविण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी केंद्रीय मंत्र्यांची सूचना मिळताच ईएसआयसी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला त्यांचा रुग्ण कक्ष परत मिळणार आहे.
दोन दिवसात मुंबई महानगरपालिका त्यांची साधनसामग्री घेऊन जाणार आहे. रुग्ण कक्ष ताब्यात आल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होणार आहे. डॉ. केतन छेडा, रुग्णालय प्रमुख, कांदिवली ईएसआयसी रुग्णालय कांदिवली ईएसआयसी रुग्णालयातील रूग्ण कक्षामध्ये ठेवलेले सामान हलविण्यात येईल. संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका