मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन सुरु असलेल्या खुल्या चौकशीला हजर राहण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. एसीबीने याआधी बजावलेल्या दोन समन्सर्ला सिंह हजर राहिलेले नाहीत. त्यांनी एसीबीकडे हजर राहण्यासाठी काही कालावधी मागितला होता.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मात्र परमबीर सिंह यांच्या विरोधातही गैरकारभार आणि भ्रष्टाचारांच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले. यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसीबीने गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारीवरुन राज्य शासनाने एसीबीला सिंह यांच्या विरोधात खुली चौकशी करण्यासाठी गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यान परवानगी दिली होती. एसीबीने १० आणि १८ जानेवारीला सिंग यांना चौकशीला बोलावले होते. मात्र गेल्या तारखेला सिंग यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रर्दुभावाचे कारण देत दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यानंतर आता एसीबीने सिंग यांना नव्याने समन्स बजावले आहे.