मुंबई : मुंबईतील घरे आणि भूखंडांचे गगनाला भिडणारे भाव हा नेहमीच अचंब्याचा विषय असतो. त्यातही जर ठिकाण जुहू, पाली हिल किंवा दक्षिण मुंबईसारखा भाग असेल तर तिथले भाव आ वासणारे असतात आणि बाजारात त्यांची चर्चा होत राहते. मुंबई उपनगरातील अशाच एका भूखंडाच्या विक्रीची म्हणजेच त्याला मिळालेल्या विक्रमी मूल्याची चर्चा मालमत्ता बाजारात दीर्घकाळ होत राहणार आहे.
हा भूखंड आहे जुहूतील. ६९८८ चौरस मीटरचा हा भूखंड ३३२ कोटीं रुपयांना विकला गेला आहे. हा एक मोठा व्यवहार असल्याचे मानले जाते. उपनगरात काही प्रमाणात मोकळे भूखंड असून त्यांना मोठी मागणी आहे. वांद्रे, सांताक्रूझ, जुहू, अंधेरी येथील भूखंडांना चढा भाव आहे. जुहू, अंधेरी परिसर निवासी आणि अनिवासी या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो. त्यातही आलिशान सदनिका, बंगले आणि कलाकार, वलयांकितांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणून जुहू परिसराला ओळखले जाते. याच भागातील एक भूखंड विक्रमी किंमतीला ७ सप्टेंबरला विकला गेल्याची माहिती उघड झाली आहे. जुहूतील ६९८८ चौ. मीटरचा (७४,५८९ चौ. फूट) क्षेत्रफळाचा हा भूखंड आहे. तो विकसित करण्यासाठी अग्रवाल होल्डिंग प्रा. लिमिटेडने पवनकुमार शिविलग प्रभू यांच्याकडून ३३२ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९.९६ कोटी मुद्रांक शुल्क
या भूखंडासाठी खरेदीदाराने १९ कोटी ९६ लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले आहे. मालमत्ता बाजारातील एक मोठा व्यवहार म्हणून या भूखंडविक्रीकडे पाहिले जात आहे.
खरेदीचा धडाका हा भूखंड ज्या अग्रवाल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केला आहे, त्याच कंपनीने गेल्या वर्षी जुहूत एक महागडा बंगला खरेदी केला होता. प्रसिद्ध लेखक सिद्धार्थ धनवंत संघवी यांचा जुहू येथील ९७९५ चौ. फुटांचा बंगला याच कंपनीने खरेदी केला होता. त्यासाठी कंपनीने ८४ कोटी ७५ लाख रुपये मोजले होते. आता वर्षभरात कंपनीने ही दुसरी मालमत्ता खरेदी केली आहे.