आयपीएलवरून सध्या वादाचा धुराळा उडाला असतानाच महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांच्यावर पाकिस्तानच्या भेटीवरून तोफ डागली. २००४ मध्ये भारतीय संघाबरोबर लाहोरला गेलेले शुक्ला यांनी कोणाच्या सांगण्यावरून पाकिस्तानातील काही उच्चपदस्थांची भेट घेतली होती याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘जी डेस्क’ने डिसेंबर २००४ मध्ये सादर केलेल्या अति गोपनीय पत्राचा हवाला देत आंबेडकर यांनी शुक्ला यांना संशयाच्या भोवऱ्यात उभे केले. हे गुप्त पत्र कुठून आले, कसे मिळाले, इतक्या विलंबाने का प्रसिद्धीस दिले याबद्दल अधिक माहिती देण्यास आंबेडकर यांनी नकार दिला. आपण माहितीच्या अधिकारात ही माहिती विचारली असता माहिती देण्यात टाळाटाळ होत असल्याचे ते म्हणाले.
या कथित गोपनीय पत्रातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे : (१) ५ एप्रिलला २००४ मध्ये भारत-पाकिस्तान एक दिवसीय सामन्याच्या वेळी राजीव शुक्ला दुपारी अडीचपर्यंत लाहोरच्या गडाफी मैदानात होते. नंतर ते तेथून बाहेर पडले. (२) पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हस्तक मेजर अतिक-उर-रेहमान यांच्या फार्महाऊसमध्ये शुक्ला गेले. तेथे भारताचा शत्रू नं १ (दाऊद?) आधीच उपस्थित होता. (३) या बैठकीत ‘रॉ’चा कारभार, त्यांची आर्थिक तरतूद वगैरे माहिती दिली. याशिवाय या चर्चेत आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली होती.

कारवाई करणार
आपल्या पाकिस्तान भेटीबद्दलचे हे गोपनीय पत्र बनावट असल्याचा दावा केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. पाच वर्षांपूर्वी हेच पत्र नवी दिल्लीत वाटण्यात आले होते. त्यावर कोणाच्याही स्वाक्षऱ्या नाहीत. तसेच गुप्तचर विभागाकडून पत्रव्यवहारात सांकेतिक शब्द वापरले जातात याकडे शुक्ला यांनी लक्ष वेधले. बदनामीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही शुक्ला यांनी स्पष्ट केले.