ST Workers Protest : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे.
आक्रमकम झालेले कर्मचारी अचानकपणे आज शरद पवार यांच्या निवास्थानाच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक देखील केली. शिवाय, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधता जोरदार घोषणाबाजी केली. या ठिकाणी मोजकाच पोलीस बंदोबस्त असल्याने आणि आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बराच गोंधळ देखील उडाला आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरच ठिय्या दिला आहे. पोलिसांचा फौजफाटा पवारांच्या निवास्थानी दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या असून त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवत, शांतता राखण्याचे आंदोलकांना आवाहन केले आहे.
दुसरीकडे पोलीस आंदोलक कर्मचाऱ्यांना एका स्कूलबस मध्ये बसवून आझाद मैदानाकडे नेत आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते देखील सिल्व्हर ओक येथे दाखल झाले असून, शरद पवारांच्या समर्थानार्थ घोषणबाजी सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
एसची कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना शरद पवार जबाबदार – आंदोलक कर्मचाऱ्यांचा आरोप
”हे चोरांचं सरकार, इथले वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हे चोरांचं सरकार आहे, आमच्यावर अन्याय होतोय हे दिसत नाही का? महाराष्ट्राच्या जडणघडणीत आमचाही वाटा आहे.” असं आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम!
“२२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर हजर होतील, यांच्यावर कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. कालच न्यायालयाने सांगितलेलं आहे की, जे कामगार न्यायालायाने दिलेल्या मुदतीत कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. ” अशा शब्दांमध्य काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिलेला आहे.
आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष; निकालाच्या प्रतीची प्रतिक्षा
तर, निवृत्तीवेतन, उपदानाचा (ग्रॅच्युईटी) लाभ द्यावा आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई नको, असे आदेश न्यायालयाने एसटी महामंडळाला दिल्यानंतर आझाद मैदानात उपस्थित कर्मचाऱ्यांकडून काल एकच जल्लोष करण्यात आला. संप मागे घ्यायचा की नाही हे न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत आल्यावरच ठरवू, असे संपकरी कर्मचाऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.