मुंबई : महापालिकेच्या एम / पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांना झालेल्या धक्काबुक्की आणि शाई फेक प्रकरणी सर्व कामगार-कर्मचारी, अधिकारी, अभियंते हे एम पूर्व विभाग कार्यालय परिसरात आंदोलन करणार आहेत. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी मुंबई कॉंंग्रेसच्यावतीने २४ विभाग कार्यालयांवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गोवंडी येथे एम पूर्व विभाग कार्यालयावरील मोर्चादरम्यान एका पालिका अभियंत्यावर शाईफेक केल्यामुळे व त्यांना आंदोलनकर्त्यांपैकी एकाने जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे हे प्रकरण तापले आहे. या प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

आंदोलनादरम्यान गोवंडी येथे एम पूर्व विभाग कार्यालय येथे मोर्चाच्या शिष्टमंडळातील एका सदस्याने विभागीय कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांच्यावर शाई फेकली. तसेच ‘हमारा काम नही किया तो तुमको जानसे मार दुंगा, ये तो सिर्फ एक नमुना है’ अशी धमकीही दिली. या प्रकरणी पालिका प्रशासनाने पोलिस ठाण्यात तक्रार (एफआयआर) दाखल केली आहे. या इसमाचे नाव आरीफ आब्बास सय्यद असे असून तो मुंबई युवक कॉंंग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे.  शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत असताना या इसमाने आपल्या साथीदारांच्या सहकार्याने कट रचून चेहरा, डोळे आणि कपड्यांवर शाई फेकल्याचे अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

हेही वाचा >>> भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे येथे पालिका अभियंत्याला मारहाण केली होती. वारंवार लोकप्रतिनिधींकडून पालिका कर्मचारी व अभियंत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे पालिका अभियंत्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. गोवंडीमध्ये अभियंत्यावर झालेल्या हल्ल्याचा म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनने निषेध केला आहे. तसेच समाजकंटकांना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्व अभियंत्यांना सोमवारी सकाळी एम-पूर्व विभाग कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी एम पूर्व आणि एम पश्चिम या कार्यालयात काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. तसेच म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.  मारहाण करणाऱ्यांना अटक झाली नाही, तर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची घोषणा अशोक जाधव यांनी केली आहे.