हजारो नागरिकांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आठ दिवस चालणाऱ्या आगरी महोत्सवाचे रविवारी संध्याकाळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. मैत्री असेल तर प्रसंगासाठी जीवाची बाजी लावणारा आणि संघर्षमय परिस्थितीत शत्रुत्व घेणाऱ्या आगरी समाजाची ब्रिटिशांनीही दखल घेतली होती. मनात कोणताही आकस न ठेवता वागणाऱ्या, अन्यायासाठी झगडणाऱ्या आगरी समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत खूप मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी याप्रसंगी बोलताना काढले. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा असल्याने कोणाचेही सत्कार करण्यात आले नाहीत. या कार्यक्रमाला पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावीत, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, खासदार आनंद परांजपे, आमदार किसन कथोरे, रमेश पाटील, रवींद्र चव्हाण, रामशेठ ठाकूर, अध्यक्ष गुलाब वझे, डॉ. संजीव नाईक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
आगरी समाजाच्या शौर्याचे ब्रिटिशांनीही कौतुक केले होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळे म्हणून आगरी समाजाने मोठे योगदान दिले आहे. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लहान-मोठय़ा चळवळीत मग तो चिरनेरचा, जासईचा सत्याग्रह असो अशा ठिकाणी आगरी समाजाचे नेते ना. गो. पाटील, प्रभाकर पाटील, तुकाराम वाझेकर, ग. ल. पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी अग्नी पेटविला. सामाजिक कार्यात, विधिमंडळात, संसदेत जी. बी. पाटील, दत्ता पाटील या मंडळींनी अन्य समाजांचे प्रश्न तळमळीने मांडून त्यांची सोडवणूक केली. अन्यायासाठी टोकाचा संघर्ष करणाऱ्या आगरी समाजाचे सामाजिक महत्त्व खूप मोलाचे आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी कौतुक केले. आपल्या समाजाची पारंपरिक ओळख नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने आगरी युथ फोरमतर्फे भरविण्यात येणारा हा महोत्सव समाजाला एक नवीन दिशा देत आहे. गुलाब वझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे त्यांनी नमूद केले.
ठाणे, रायगड जिल्ह्यांत आगरी समाज खूप मोठय़ा प्रमाणात आहे. या समाजाचे पारंपरिक शेती, मासेमारी हे व्यवसाय टिकले पाहिजेत. हा विचार करून राज्य शासनाने या भागातील पारंपरिक व्यवसाय मोडीत निघणार नाहीत याचा विचार करून या भागाचे विकासाचे सूत्र निश्चित करावे. येथील शेती व्यवसाय टिकला पाहिजे, अशी सूचना आपण शासनाला करू असे पवार यांनी सांगितले. या वेळी कीर्तनकार वासुदेव महाराज यांचा आगरी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक गुलाब वझे यांनी केले. सूत्रसंचालन मंगला आठलेकर यांनी केले. ९ डिसेंबपर्यंत चालणारा हा महोत्सव संध्याकाळी ४ ते रात्रो १० वाजेपर्यंत खुला राहणार आहे.   

Story img Loader