डोंबिवलीची महाजत्रा म्हणून ओळखला जाणाऱ्या आगरी महोत्सवाची रविवारी लाखो नागरिकांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने मुंबई, नाशिक, पुणे, कोकणातील जिल्ह्य़ांमधून नागरिक खास गाडय़ा करून महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते. लाखो नागरिकांचा जनसमुदाय आगरी महोत्सवात लोटला होता. दुपारी तीन वाजल्यापासून महोत्सावाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. महोत्सवातील १२५ स्टॉलधारकांनी गेले सात दिवसात माल संपविल्यानंतर साहित्याचा शेवटचा हप्ता संपविण्यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यात रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबासह प्रत्येक जण आगरी महोत्सवात सहभागी झाला होता. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस, खासगी स्वयंसेवक यांचा जागोजागी पहारा ठेवण्यात आला होता. वसई, विरार पट्टय़ातील सुकी मासळी पुन्हा भेटणार नाही हा विचार करून महिलांनी सुक्या मासळी बाजारात विशेष गर्दी केली होती. खाद्यपदार्थाचे स्टॉल गर्दीने गच्च भरून गेले होते.
खरेदीसाठी झुंबड उडाली असतानाच, रंगमंचावर आगरी, कोळी गीतांनी धुमशान घालून महोत्सवाला एका टिपेला नेले होते. आगरी महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी नागरिक, पोलीस, सहकारी आदी सर्वाचे सहकार्याबद्दल आभार मानले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा