मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबई उपनगरावर भाजपची मदार असल्याने या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपने स्वत:कडे ठेवले असून, मंगलप्रभात लोढा यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. विदर्भातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी सध्या तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मुंबई पालिकेच्या कारभाराची चौकशी?; शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी शिंदे गटाच्या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  पालकमंत्र्यांची नियुक्ती होत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात होती. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने जिल्ह्यांच्या विकासावर परिणाम होत होता. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास पावणे दोन महिन्यांनंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका जिंकणे हे पहिले लक्ष्य आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हा महत्त्वाचा आहे. कारण त्याच भागातून जास्त नगरसेवक निवडून येतात. यातूनच भाजपने मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले असून, मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेचा खडसेंकडून इन्कार; अमित शहा-खडसे यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिंदे यांनी स्वत:च्या गटाकडे ठेवले आहे. ठाण्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा डोळा होता. भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्याच्या प्रश्नांच्या संदर्भात अलीकडे बैठकाही घेतल्या होत्या. पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.  भाजपच्या दृष्टीने विदर्भाचा गड आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामुळेच विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंत या सहा जिल्ह्यांची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे असेल. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ठेवण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आदी शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे सोपविण्यात आले आहे. यामुळे या जिल्ह्यांमध्ये शिंदे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक प्रखर होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी प्रवृत्ती ठेचा; भाजप-मनसेची मागणी

नवे पालकमंत्री

  • दीपक केसरकर- मुंबई शहर, कोल्हापूर.
  • अतुल सावे- जालना, बीड. 
  • शंभुराज देसाई- सातारा, ठाणे.
  •   मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर.
  • सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया.
  • चंद्रकांत पाटील- पुणे.
  • विजयकुमार गावित- नंदुरबार.
  • गिरीश महाजन-धुळे, लातूर, नांदेड.
  • गुलाबराव पाटील- बुलढाणा, जळगाव. 
  • दादा भुसे- नाशिक.
  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम.
  • सुरेश खाडे- सांगली. 
  • संदिपान भुमरे- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर).
  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड.
  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग.
  • तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव).
  • अब्दुल सत्तार- हिंगोली.

विस्तार लांबणीवर ?

 पालकमंत्र्यांची यादी जाहीर करून बहुतांशी मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावरून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लगेचच केला जाणार नाही, असे संकेत प्राप्त होतात. मंत्रिमंडळाचा विस्तार ही भाजप आणि शिंदे या दोघांसाठी डोकेदुखी ठरू शकते. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतरच पुढील वर्षांत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी शक्यता आहे.

Story img Loader