शासन व एआयसीटीईची फसवणूक प्रकरण
‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’च्या (एआयसीटीई) ‘स्वयं साक्षांकित’ (सेल्फ अटेस्टेड) माहिती सादर करण्याच्या पद्धतीचा गैरफायदा घेत खोटी माहिती देणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्य व संस्थाचालकांवर फसवणूक केल्याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आपल्या महाविद्यालयात ‘एआयसीटीई’च्या सर्व निकष व नियमांचे पालन होत असून कोणतीही त्रुटी नसल्याची धादांत खोटी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली जाते. त्यामुळे, अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी ‘सिटीझन फोरम फॉर सँटिटी इन एज्युकेशन सिस्टिम’चे प्रमुख व आमदार संजय केळकर यांच्यासह अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असे सांगत आहेत. त्याचे पालन करण्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे हे का टाळाटाळ करत आहेत तेही स्पष्ट झाले पाहिजे, अशीही मागणी या संघटनांकडून करण्यात येत आहे. २०१० पासून अनेकदा शिक्षण सम्राटांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’कडे प्रवेश मान्यतेच्यावेळी महाविद्यालयात कोणतीही त्रुटी नसल्याचे धादांत खोटे लिहून दिले आहे. ही गोष्ट ‘एआयसीटीई’ व तंत्रशिक्षण संचालनालयाने वेळोवेळी केलेल्या तपासणीत उघडकीसही आली आहे. गेल्या वर्षी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील सर्व अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी करून त्रुटी अथवा खोटी माहिती देणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. तंत्रशिक्षण संचालनालयाने याबाबत चौकशी करून तयार केलेल्या अहवालानुसार नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील ७० टक्के महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ला खोटी माहिती भरून दिल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबतचे अहवाल संचालनालयाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्याकडे पाठविले असून त्याची माहितीही त्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या साऱ्यात विद्यार्थी, शासन तसेच ‘एआयसीटीई’ची उघड उघड फसवणूक होऊनही आजपर्यंत विभागाचे मंत्री विनोद तावडे गप्प का, असा सवाल ‘प्रहार विद्यार्थी संघटने’चे अध्यक्ष अॅड.मनोज टेकाडे व अॅड.विजय तापकीर यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात ‘कुंभकर्णा’सारखे अभियांत्रिकीतील भ्रष्टाचाराबाबत झोपलेल्या तावडे यांना जागे करण्याचे तसेच या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य व संस्थाचालकांवर फौजदारी कायदा कलम ४२० अंतर्गत खटला दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुहूर्त कधी?
एखाद्या विद्यार्थ्यांने कॉपी केली तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होते. तिथे तो विद्यार्थी कॉपी करताना किमान खरे उत्तर तरी लिहित असतो इथे प्राचार्यानीच खोटी माहिती भरलेली असताना कारवाईचा मुहूर्त शोधण्याचे काम का चालले आहे का?
– संजय केळकर