मार्चला मुंबईत अन् जूनमध्ये प्रवाशांच्या सेवेत

मुंबईकरांना गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणारी वातानुकूलित लोकल गाडी आणखी एक मुहूर्त हुक9वणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल होणार असलेल्या या गाडीचे २५ टक्के काम अजूनही शिल्लक असल्याने आता ही गाडी मार्चशिवाय मुंबईत येणार नसल्याची माहिती थेट इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीतील सूत्रांकडून मिळाली आहे. मार्चमध्ये मुंबईत आल्यानंतर या गाडीची चाचणी घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर जून महिन्याच्या आसपास ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.

वातानुकूलित लोकल गाडी पश्चिम रेल्वेवर येणार असल्याची आवई गेल्या दोन वर्षांपासून उठत आहे. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पातही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबतची घोषणा केली होती.

चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीतील सूत्रांना विचारले असता वातानुकूलित गाडीच्या बांधणीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही गाडी तयार होत असून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत दाखल होणार, अशी योजना होती. मात्र अचानक काही अडचणी उद्भवल्याने गाडीची बांधणी थांबवण्यात आली होती. या गाडीचे ७५ टक्के  काम पूर्ण झाले आहे. आता पुढील काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यानंतर पहिली वातानुकूलित गाडी मार्च महिन्यात मुंबईकडे रवाना होईल, असे या फॅक्टरीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ही गाडी मुंबईत पोहोचल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी पुढील दोन ते तीन महिने चालणार आहे. त्यानंतर या गाडीत बदल सुचवण्यात आले, तर ते करून नवीन गाडय़ा मुंबईत जून अखेरीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत एकूण १० वातानुकूलित लोकल गाडय़ा दाखल होणार असल्याची माहितीही त्याने दिली.

मुहूर्ताचे सरकणे..

मुंबई भेटीत सुरेश प्रभू यांनी ही लोकल ऑक्टोबर महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याचे स्पष्ट केले होते.  हा मुहूर्त दिवाळीच्या पल्ल्याड सरकला. दिवाळीतही मुंबईत वातानुकूलित लोकल आली नाही. मग डिसेंबर २०१५चा लागला. त्यानंतर हा मुहूर्त अचानक जानेवारी २०१६च्या अखेरीवर गेला.पण तोही पुढे सरकला.

Story img Loader