मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांतील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. प्रवाशांना प्रवास करताना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. तसेच बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील बसची संख्या हळूहळू कमी होत असून बेस्ट बसची वारंवारिता कमी होत आहे. परिणामी, दुपारी प्रवाशांना बस थांब्यावर ताटकळावे लागत असून उन्हाच्या झळांनी प्रवासी बेजार होऊ लागले आहेत. उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या ताफ्यात येत्या काळात टप्प्याटप्प्याने २,१०० वातानुकूलित बस समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.

बेस्ट बसच्या ताफ्यात नुकताच काही वातानुकूलित बस दाखल झाल्या असून या बस बसमार्ग क्रमांक ३४० आणि बसमार्ग क्रमांक ४२२ वर चालवण्यास सुरुवात झाली आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक ३४० वर घाटकोपर स्थानक (पश्चिम) ते आगरकर चौक दरम्यान एकूण १५ बस आणि बेस्ट बस मार्ग क्रमांक ४२२ विक्रोळी आगार – वांद्रे बस स्थानक (पश्चिम ) दरम्यान एकूण ९ बस धावत आहेत.

भाडेतत्वावरील बसवर भर

एकीकडे बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील अनेक मार्ग अंशत: आणि पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. तसेच काही मार्गांवर बसची वारंवारता कमी असल्याने, प्रवाशांचा खोळंबा होत आहे. सध्या मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ होत असून प्रवाशांना प्रवास तापदायक ठरत आहे. त्यामुळे बेस्ट बसचा भाडेतत्त्वावरील बसचा ताफा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

विद्युत आणि एक मजली बस

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने विद्युत वातानुकूलित बसचा ताफा वाढविण्यात येणार आहे. बस ताफ्यात डिसेंबर २०२५ पर्यंत २,१०० वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत. या सर्व बस विद्युत असून एक मजली बस असतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने दिली.

निवृत्तांना देणी मिळण्याची शक्यता

मुंबई महापालिकेने बेस्टला जाहीर केलेल्या अनुदानापैकी पहिला १०० कोटी रुपयांचा हफ्ता नुकताच बेस्ट प्रशासनाला देण्यात आला. मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानातून कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्तीची थकबाकी द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच बेस्टला दिले होते. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून तब्बल १००० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. त्यापैकी पहिला १०० कोटी रुपयांचा हफ्ता मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला नुकताच दिल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

स्वमालकीच्या केवळ ७४८ बस

बेस्टच्या ताफ्यात सुमारे २,८२२ बस आहेत. यामधील २,०७४ बस या भाडेतत्त्वावरील आणि ७४८ बस स्वमालकीच्या आहेत. यापैकी वातानुकूलित १,४५४ बस भाडेत्त्वावरील आहेत. यापैकी ८२९ विद्युत वातानुकूलित आणि ६२५ सीएनजी वातानुकूलित बस आहेत. येत्या काळात यात वाढ होऊन प्रवाशांना आरामदायी आणि थंडगार प्रवाशाचा अनुभव घेता येईल.