मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा दाह वाढत असून मुंबईकरांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर गारेगार प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती देऊ लागले आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने अचानक गुरुवारी वातानुकूलित लोकल रद्द केल्यामुळे प्रवासी बेहाल झाले. वातानुकूलित लोकलचे तिकीट असतानाही प्रवाशांवर सामान्य लोकलमधून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली. यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवासी जादा लोकल चालवण्याची मागणी करीत आहेत. वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचलीे. या १०९ वातानुकूलित लोकलमधून दररोज सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात.
परंतु, पश्चिम रेल्वेने अचानक २७ आणि २८ मार्च रोजी डाऊन मार्गावरील ८ लोकल फेऱ्या आणि अप मार्गावरील ९ लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा नियोजित प्रवास खोळंबला. तसेच त्यांना त्रासदायक, धक्काबुक्की सहन करीत सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागला.
पश्चिम रेल्वेवरील १७ वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये ११ अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जलद वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या कमी झाल्याने, प्रवाशांचा प्रवास रखडणार आहे. तसेच ६ अप आणि डाऊन धीम्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. १७ वातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या नियोजित वेळेत सामान्य लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे महागडे तिकीट विकत घेऊनही सामान्य लोकलमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. दोन दिवस या लोकलच्या पासधारक प्रवाशांचे पैसे वाया जाणार आहेत. दरम्यान, अत्यावश्यक देखभालीसाठी २७ मार्च आणि २८ मार्च रोजी एकूण १७ वातानुकूलित लोकल फेऱ्यांऐवजी सामान्य लोकल धावतील, अशी पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
२७ मार्च, २८ मार्च रोजी या वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द
सकाळी ६.३५ चर्चगेट ते बोरिवली धीमी लोकल
सकाळी ८.४६ चर्चगेट ते बोरिवली जलद लोकल
सकाळी १०.३२ चर्चगेट ते बोरिवली जलद लोकल
दुपारी १२.१६ चर्चगेट ते विरार जलद लोकल
दुपारी ३.०७ चर्चगेट ते विरार जलद लोकल
सायंकाळी ६.२२ चर्चगेट ते विरार जलद लोकल
रात्री ९.२३ चर्चगेट ते भाईंदर धीमी लोकल
रात्री ११.१९ बोरिवली ते विरार धीमी लोकल
पहाटे ४.५० नालासोपारा ते चर्चगेट धीमी लोकल
सकाळी ७.४६ बोरिवली ते चर्चगेट जलद लोकल
सकाळी ९.३५ बोरिवली ते चर्चगेट जलद लोकल
सकाळी ११.२३ बोरिवली ते चर्चगेट जलद लोकल
दुपारी १.३४ विरार ते चर्चगेट जलद लोकल
दुपारी ४.४८ विरार ते बोरिवली धीमी लोकल
सायंकाळी ५.२८ बोरिवली ते चर्चगेट जलद लोकल
सायंकाळी ७.५१ विरार ते चर्चगेट जलद लोकल
रात्री १०.५६ भाईंदर ते बोरिवली धीमी लोकल