मुंबई : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल सेवा १४ मेपासून बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर १६ फेऱ्या होत होत्या. हार्बरवर वातानुकूलित फेऱ्यांऐवजी विना वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बरवरील वातानुकूलित फेऱ्या बंद करून त्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा या मुख्य मार्गावर आणखी १२ वातानुकूलित फेऱ्या सुरू केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलचा ज्या प्रवाशांनी पास काढला आहे.त्यांना तिकिट खिडकीवर शिल्लक दिवसांचा परतावा देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून आणि जानेवारी २०२१ पासून ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावली. पाठोपाठ सीएसएमटी ते पनवेल, गोरेगावही सेवेत आली. अल्प प्रतिसादामुळे ट्रान्स हार्बवरील वातानुकूलित लोकल सेवा नुकतीच बंद करण्यात आली होती, तर हार्बरवरील सेवेलाही प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचा आढावा मध्य रेल्वेकडून घेतला जात होता. ५ मेपासून तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळासाठी प्रतिसाद वाढू लागला. परंतु हार्बरवरील वातानुकूलित लोकल गाडीला प्रवाशांची प्रतिक्षाच होती. अखेर हार्बरवरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १२ वातानुकूलित लोकल फेऱ्यांची भर पडल्याने या मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ वर पोहोचली आहे.
वातानुकूलित लोकल रविवारीही धावणार
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वातानुकूलित लोकल गाडीला वाढलेल्या प्रतिसादामुळे रविवारी तसेच सरकारी सार्वजनिक सुटटय़ांच्या दिवशीही वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवसात १४ फेऱ्या होतील.
- कुर्ला ते सीएसएमटी प. ४.४६ वा, स.९.५६ वा.
- कल्याण ते सीएसएमटी स. ७.५६ वा.
- डोंबिवली ते सीएसएमटी प. ४.५५ वा. आणि दु. ३.२४ वा
- कल्याण ते दादर स. ११.२२ वा.
- कल्याण ते सीएसएमटी स. ६.३२ आणि स. ८.५४ वा.
- बदलापूर ते सीएसएमटी दु. १.४८ वा.
- सीएसएमटी ते कल्याण प. ५.२० वा. स.७.४३, स. १०.०४ आणि संध्या ६.३६ वा.
- दादर ते बदलापूर दु १२.३० वा.