राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक आणि वाहकांसाठी मुंबई सेंट्रल येथे अत्याधुनिक वातानुकूलित विश्रांतीगृह उभारण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी ‘हिरकणी’ कक्षाचे उद्घाटन करताना केली. त्यामुळे राज्यभरातून मुंबई सेंट्रल आगारात येणाऱ्या चालक आणि वाहकांसाठी विश्रांती करण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई: तेजस एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधांचा अभाव; जेवणाचा दर्जा घसरल्याची प्रवाशांची तक्रार
जिल्हा नियोजन मंडळाच्या तीन टक्के निधीतून बांधण्यात आलेल्या पहिल्या ‘हिरकणी’ कक्षाचे उद्घाटन एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात सोमवारी सायंकाळी दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर व एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. चालक आणि वाहकांसाठी उपलब्ध असलेले विश्रांतीगृह गैरसोयीचे असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर केसरकर यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून मुंबई सेंट्रल बसस्थानकात महिला आणि पुरुषांसाठी अत्याधुनिक सुविधांसह वातानुकूलित विश्रांतीगृह उभारण्याचे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. भविष्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी विश्रांतीगृहे जिल्हा नियोजन व विकास योजनेतून उभारावीत, असे केसरकर यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले की, मी कोकणातील आहे. एसटी आणि कोकणी माणसाचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. गणपती व होळीसारख्या सणाबरोबरच मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना उन्हाळ्याच्या सुट्टीत, आंगणेवाडीच्या यात्रेच्या निमित्ताने तेथे सुखरूप घेऊन जाण्याचे काम गेली कित्येक वर्ष एसटी करीत आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी- मुंबई या पहिल्या ‘रातराणी’ बसची आठवण आवर्जून सांगितली.
हेही वाचा >>> बांधकाम व्यवसायातील दलालांच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर; ४२३ पैकी ४०५ उमेदवार यशस्वी,पहिल्या परीक्षेचा ९६ टक्के निकाल
राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करता यावा यासाठी जाहीर केलेली अमृत महोत्सवी योजना व महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत यामुळे एसटीला पुन्हा ‘अच्छे दिन’ आले आहेत, असेही ते म्हणाले. मुंबई सेंट्रल आगारात ३५० पुरुष एसटी कर्मचाऱ्यांसाठी आणि ३० महिला एसटी कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह आहे. मात्र अनेक वर्षांपासून हे विश्रांतीगृह दुरवस्थेत आहे. येथे अनेक गैरसोयी असल्याने दिवसभर दमून-भागून आलेल्या चालक-वाहकांना विश्रांती घेणे कठीण होते. येथे अत्याधुनिक आणि वातानुकूलित विश्रांतीगृह उभारल्यास चालक आणि वाहकांना चांगली झोप लागेल. तसेच दुसऱ्या ताजेतवाने होऊन योग्य प्रकारे कामगिरी बजावतील, असा विश्वास एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.