मुंबई : बोरिवली पूर्व आणि भायखळामध्ये बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेची गुणवत्ता सुधारल्याचा दावा पालिकेच्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या एक – दोन दिवसात या परिसरातील बांधकामांवरील निर्बंध उठवले जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर नेव्हीनगर आणि शिवाजीनगर परिसरातील हवेचा स्तर शुक्रवारी बिघडल्यामुळे या परिसरातही बांधकामांवर निर्बंध घालण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे.
मुंबईतील हवेचा स्तर बिघडू लागल्यामुळे मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात कठोर उपाययोजना सुरू केल्या होत्या. बोरिवली पूर्व आणि भायखळा या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेल्यामुळे या परिसरातील सर्व बांधकामांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही परिसरातील ७८ बांधकामांवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी घातल्यानंतर चारच दिवसात या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक चांगलाच खाली आला असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भायखळ्यातील हवेचा निर्देशांक १२५ ते १४० च्या दरम्यान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अजून एक दोन दिवस आढावा घेऊन या भागातील निर्बंध उठवण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, गोवंडी – शिवाजीनगर आणि कुलाबा नेव्हीनगर येथील हवेचा स्तर बिघडत असल्यामुळे येत्या एक दोन दिवसात येथील बांधकामांवरही निर्बंध घालण्यात येतील असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान नेव्हीनगर येथे भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांकात फरक असल्यामुळे या ठिकाणी वाहनारुढ गुणवत्ता मापक यंत्रे उभी करण्यात आली असून त्यातून खरा निर्देशांक मिळू शकेल, असा विश्वास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शिवाजीनगर, नेव्हीनगरची हवा बिघडली
बोरिवली व भायखळ्यातील हवेचा स्तर सुधारत असला तरी तरीही मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारीही शिवाजीनगर येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे. गोवंडीतील शिवाजीनगर येथे शुक्रवारीही सायंकाळी हवा ‘वाईट’श्रेणीत नोंदली गेली. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक २१२ इतका होता. त्याचबरोबर नेव्ही नगर येथेही ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथे २६० इतका हवा निर्देशांक होता. गोवंडी शिवाजीनगरमधील हवा मागील दोन महिन्यांपासून अनेकदा वाईट श्रेणीत नोंदली गेली आहे. तेथे पीएम २.५ धुलीकणांची मात्रा अधिक होती. दरम्यान, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण या परिसरात अधिक आहे. राडारोड्याची अवैध वाहतूक, तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे सतत प्रदूषण वाढत आहे. यापूर्वीही अनेकदा शिवाजीनगरमधील हवेची वाईट ते अतिवाईट श्रेणीत नोंद झाली होती. आता पुन्हा तेथील हवा गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विविध उपाययोजना करूनही या परिसरातील हवेच्या गुणवत्तेत फरक पडलेला नाही. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील स्थानिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
बोरिवली आणि भायखळ्यातील हवेच्या गुणवत्तेचे एक दोन दिवस निरीक्षण करून हवा चांगली असेल तर बांधकामांवरील निर्बंध सरसकट उठवले जातील. नियम न पाळणाऱ्या प्रकल्पांवरील कारवाई सध्याही सुरू आहेत व ती सुरूच राहील. – भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिका आयुक्त