लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. मात्र दोन दिवसांपासून हवेची गुणवत्ता काही भागात वाईट, तर काही भागात मध्यम असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, गोवंडीमधील शिवाजी नगर येथे सलग दुसऱ्या दिवशी ‘वाईट’ हवेची नोंद झाली आहे. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धूलिकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले असून तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक २०३ होता. यामुळे अशा वातावरणात घराबाहेर पडणे घातक ठरू शकते.
मुंबईत सध्या अवेळी पाऊस पडत आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईतील सरासरी हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. मात्र दोन दिवसांपासून काही ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात असून, बुधवारी शिवाजी नगरमध्ये हवेची गुणवत्ता ‘वाईट’ नोंदली गेली. येथे पीएम २.५ ची मात्रा अधिक होती. दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने बांधकामाची धूळ हवेत पसरण्याचे प्रमाण या परिसरात अधिक आहे. राडारोड्याची अवैध वाहतूक, तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे सतत प्रदुषण वाढत आहे.
आणखी वाचा-‘मेट्रो ३’ विस्कळीत, दोन दिवसांतच तांत्रिक अडचणी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान चांगला, ५१-१०० दरम्यान समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० दरम्यान वाईट, ३०१-४०० दरम्यान अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता अतिधोकादायक समजली जाते.
पीएम २.५ म्हणजे काय?
हवेतील पीएम २.५ हे प्रमाण पीएम १० पेक्षा अतिघातक आहे. हे कण श्वास घेताना सहज नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. हे धुळीकण हृदयविकाराचा झटका, दमा तसेच श्वसनाच्या इतर समस्या निर्माण करतात. बांधकामस्थळी, रस्त्यावरील धूळ, झिझेल वाहन, कारखान्यांतील उत्सर्जन यामुळे हे प्रदुषण होते.
आणखी वाचा-रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर; अभ्युदयनगर वसाहत पुनर्विकास; बांधकामासाठी आज निविदा
हवेचा दर्जा ढासाळल्याने काळजी काय घ्यावी ?
प्रदुषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
समीर ॲपच्या नोंदीनुसार बुधवारी सकाळी हवेचा निर्देशांक
भायखळा-११६
शिवडी-१८०
मालाड-१०१
माझगाव -१२०