DGCA ने एअर इंडियावर कारवाई करत या कंपनीला १.१० कोटींचा दंड ठोठावला आहे. सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दीर्घ सफरीवर जाणाऱ्या विमानांमध्ये सुरक्षेचे निकष योग्य पद्धतीने पाळले न गेल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
DGCA याबाबत एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. एअर इंडियाची विमानं जेव्हा दीर्घ काळासाठी उड्डाण करतात. तसंच मोठ्या सफरींवर जातात त्यावेळी सुरक्षेची काळजी घेणं आवश्यक असतं. एअर इंडियाकडून ती घेतली जात नाही असा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आळी आहे. तसंच डीजीसीएने हेदेखील म्हटलं आहे की आमच्या तपासात हे लक्षात आलं की विमानात शिस्त पाळण्यात आलेली नाही त्यानंतर आम्ही कारणे दाखवा नोटीसही एअर इंडियाला बजावली होती. हा जो अहवाल आहे तो नेमून दिलेल्या पट्ट्यांवरच्या विमानांसंदर्भातला आहे. ANI ने या बाबतचं वृत्त दिलं आहे.
डीसीजीएने १ कोटी १० लाखांचा हा दंड एअर इंडियाला कुठल्या विमानाबाबत ठोठावला आहे हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून एअर इंडिया विमानाबाबतच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यानंतर एक समिती नेमण्यात आली. त्यांच्या चौकशी अहवालानंतर हा दंड एअर इंडियाला ठोठवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच इंडिगोलाही ठोठावण्यात आला दंड
याआधी काही दिवसांपूर्वीच विमानतळाच्या धावपट्टीवरच प्रवासी जेवायला बसले होते. त्यामुळे या प्रकरणात इंडिगो या कंपनीला आणि मुंबई विमानतळ संचालक यांना मिळून १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यातला १ कोटी २० लाख रुपयांचा दंड हा इंडिगोला तर ६० लाखांचा दंड हा मुंबईत विमानतळ संचालक मंडळाला भरावा लागला.