तस्करीतील सोने विमानतळाबाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेला एअर इंडियाचा वरिष्ठ अधीक्षक व सेवा अभियंता जनार्दन कोंडविलकर याला हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) मंगळवारी मध्यरात्री अटक केली. कोंडविलकरच्या झडतीत ४४ लाख रुपये किमतीचे १६४९ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.
कोंडविलकरच्या संशयास्पद हालचालींवर काही दिवसांपासून एआययू अधिकाऱ्यांचे लक्ष होते. विमानातून प्रवास करणाऱ्या तस्कराने मागे सोडलेले सोने विमानतळाबाहेर काढण्याची जबाबदारी कोंडविलकर सराईतपणे पार पडत असावा, असा संशय आहे.
सोने घेण्यासाठी विजय रावल नावाचा तरुण विमानतळाबाहेर कोंडविलकरची वाट बघत असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार रावललाही अटक करण्यात आली. विमानतळावर एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आत-बाहेर करण्यासाठी वेगळे मार्ग आहेत. नेहमीची ये-जा असल्याने त्यांची झाडाझडती अनेकदा होत नाही. तोच फायदा घेत सोने तस्करांनी कमिशन देऊन अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या जाळय़ात ओढले आहे.