दहिसर पश्चिम येथील वैशाली इंडस्ट्रीजअंतर्गत चालणाऱ्या कारखान्यांतून हवेत सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांना प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे. येथील अनधिकृत चिमण्या कायमच्या बंद व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक प्रयत्न करीत आहेत, मात्र अद्याप या चिमण्या बंद झालेल्या नाहीत.
साधारण १० वर्षांपूर्वी झवेरी बाजार येथे आग लागल्यानंतर तेथील वैशाली इंडस्ट्रीजला दहिसर पश्चिम येथे स्थलांतरित करण्यात आले. या उद्योग संस्थेंतर्गत शोभेचे दागिने (इमिटेशन ज्वेलरी), कापड इत्यादी गोष्टींचे कारखाने चालवले जातात. या कारखान्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रसायनांपासून निर्माण होणारा धूर पीव्हीसी पाइपच्या चिमणीतून बाहेर टाकला जातो. यापैकी अनेक चिमण्या अनधिकृत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.
‘कारखान्यांतून निघणाऱ्या धुरामुळे रहिवाशांना पुरेशी ताजी हवा मिळत नाही. प्रदूषित हवेमुळे श्वसनाचे विकार होतात’, अशी माहिती रहिवासी प्रशांत जोशी यांनी दिली. पावसाळी वातावरणात चिमण्यांमधून निघणारा धूर हवेत एकाच ठिकाणी साचून राहतो. अशा स्थितीचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती रहिवाशांना वाटत आहे. रहिवाशांचा विरोध सुरू झाल्यानंतर येथील काही चिमण्यांची तोंडे प्लास्टिकने बांधून ठेवण्यात आली, मात्र तरीही प्रश्न सुटलेला नाही. काही चिमण्या अद्याप सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी ‘म्हात्रेवाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन’ने केलेल्या तक्रारीची दखल घेत नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी वैशाली इंडस्ट्रीजला भेट दिली. येथे अनधिकृत पोटमाळे बांधण्यात आले आहेत. अनेक बांगलादेशी नागरिक तेथे बेकायदा राहात आहेत. कारखान्यांना चिमण्या लावण्यास परवानगी आहे का, अग्निशमन परवाना आहे का याची चौकशी गरजेची आहे. पालिकेने कारखान्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.
अनधिकृत चिमण्यांची तोंडे बंद करण्यात आली असून संबंधित कारखाने तिथे राहणार की नाहीत हे पालिका ठरवेल. या कारखान्यांनी परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र करोनामुळे ही प्रक्रिया रखडली आहे.
– समीर शाह, अध्यक्ष, वैशाली इंडस्ट्रीज
वैशाली इंडस्ट्रीजकडून त्यांच्या इमारतीचा आराखडा मागवण्यात आला आहे. जे अनधिकृत असेल त्यावर कारवाई केली जाईल. अनधिकृत चिमण्यांबाबत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’लाही कळवले जाईल.
– मृदुला अंडे, साहाय्यक आयुक्त, आर उत्तर विभाग