नाल्यांसाठीचे खोदकाम, बांधकाम यांमुळे हवा प्रदूषण; वर्षभर कामे चालणार

एकाचवेळी सर्व ठिकाणी नाल्यांचे काम सुरू असल्याने शीव येथील प्रतीक्षानगर परिसरातील रहिवाशांना धूळ आणि मातीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आणि त्यामुळे होणाऱ्या विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. खोदकामामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. भूमिगत नाल्यांचे काम २०२०पर्यंत चालणार असल्याने तोपर्यंत येथील रहिवाशांना धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला तोंड द्यावे लागणार आहे.

शीव पूर्वेला असलेला प्रतीक्षानगर परिसर १९७० साली भराव टाकून तयार करण्यात आला. या ठिकाणी म्हाडाने शंभरहून अधिक संक्रमण इमारती बांधल्या आहेत. या शिवाय म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांसाठी या भागात निवासी इमारती बांधल्या आहेत. त्यात अत्यल्पपासून उच्च उत्पन्न गटातील इमारती आहेत. न्यायाधीश, पत्रकार, पोलीस तसेच मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांच्या वसाहती याच भागात आहेत.

प्रतीक्षानगरमधील भूमिगत गटारांचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी संपूर्ण परिसरात खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. धुळीमुळे रहिवाशांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. या कामाचा खर्च ३७ कोटी रुपये असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. ते आणखी वर्षभर चालणार आहे. त्यामुळे इथल्या सर्वच रस्त्यांवर सर्वत्र मातीच माती पसरलेली आहे. त्याचा त्रास नागरिकांनी होत आहे. नागरिकांना सर्दी, त्वचा रोग, दमा तसेच घशाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे आमच्या घराच्या खिडक्या उघडू शकत नाही. धुळीमुळे घशाचा त्रास झाल्याची माहिती येथील रहिवासी वीणा मयेकर-वाघ यांनी दिली.

‘परिसरात उभ्या असलेल्या सर्व वाहनांवर धुळीचे थर साचले आहेत. रस्ता खराब असल्याने वाहनांना जाण्यास अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. आमच्या भागाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. सुविधा मिळण्यासाठी रहिवासी त्रास सहन करत आहेत. परंतु इतका भयानक त्रास होत आहे. पालिकेने त्यावर योग्य त्या उपयायोजना करायला हव्या,’ असे ‘एच १४’मधील रहिवासी मिलिंद जाधव यांनी सांगितले. वारंवार सर्दी, खोकला होत असून कितीही औषधे घेतली तरी त्याचा परिणाम होत नाही. सकाळी चालायलाही जाता येत नाही. मुलांना घराबाहेर खेळायला पाठविणेही बंद केल्याची तक्रार रहिवासी करतात.

दुकानदारांनाही फटका

इथल्या बाजारातील वस्तूंवरही सतत धूळ साचलेली असते. त्यामुळे स्थानिकांनी भाज्या घेणे बंद केले आहे. काही दुकानदारांनी आपल्या दुकानांतील वस्तूंवर प्लास्टिकची आच्छादने लावून झाकली आहेत. गेले वर्षभर सुरू असलेल्या या कामात नियोजन दिसून येत नाही. एकदम सगळीकडचे रस्ते खणले आहेत. तसेच, एकदा रस्ता खोदला, काम केले, खड्डा बुजवला की पुन्हा खणतात. हा नेमका काय प्रकार हे समजत नाही, असे अहाना सोसायटीच्या सरचिटणीस अ‍ॅड. विजया इंगुळे यांनी सांगितले.

नागरिकांची गैरसोय होत आहे, हे खरे आहे. मात्र, कामे करताना धूळ उडू नये, यासाठी आम्ही कंत्राटदाराला रस्त्यावर नियमितपणे पाणी शिंपडण्यास सांगितले आहे.  – रामदास कांबळे, नगरसेवक

Story img Loader