Mumbai Air Quality Index Marathi News : ऑक्टोबरच्या उष्णतेचा तडाखा आणि उकाड्याने त्रासलेल्या मुंबईत हवेचाही दर्जा घसरला आहे. मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब असून ठाणे, नवी मुंबईतील हवाही खराब झाली आहे. एकूणच संपूर्ण मुंबई महानगराचा श्वास कोंडल्याचे चित्र आहे. दरम्यान, हवा खराब झाल्याने मुंबई महापालिकेकडून मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले होते. हे वृत्त मुंबई महापालिकेने फेटाळून लावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर पालिकेकडून मास्क वापरासंबंधीचे कोणतीही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने आज दिली. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा खुलासा केला आहे. प्रसिद्धी पत्रकात पालिकेने म्हटलं आहे की, “हवेची गुणवत्ता विपरित होत असल्याचे आढळल्यानंतर याअनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजनांविषयी कार्यवाही विचाराधीन आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मास्क वापरण्यासंदर्भात नागरिकांना कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही किंवा मार्गदर्शक तत्वेही अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत.”

हवामान आणि तत्संबंधीत सर्व यंत्रणांशी बृहन्मुंबई महानगरपालिका समन्वय साधत असून त्यांच्याकडून प्राप्त निर्देशांनुसार यथोचित उपाययोजना, निर्णय आदींची माहिती नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहोचविण्यात येईल, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईतील अनेक भागांतील हवा अतिवाईट असल्याची नोंद बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी करण्यात आली. विलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची स्थिती बुधवारी सायंकाळी अतिधोकादायक असल्याची नोंद झाली. हवेत साचलेले धुलीकण आणि धुके यामुळे मुंबईत धुरके पसरत असल्याचे दिसते. अनेक भागांत सकाळी आणि सायंकाळी हवेतील धुळीमुळे दृष्यमानताही कमी झाली आहे.

ठाणे शहरांतही हवेची गुणवत्ता घसरली

तसंच, ठाणे शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १४१ इतका असून, तो मध्यम प्रदूषित गटात मोडतो. मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये प्रदूषणात वाढ झाली असेल तर पुढील काही दिवस शहरातील हवा गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येईल. त्यात हवा प्रदूषित आढळली तर मुखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यासारख्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution in mumbai an appeal to use masks due to increasing pollution the municipality gave an explaination sgk