मुंबई : मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारली असल्यामुळे मुंबईत भायखळा, बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. मात्र वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील हवेचा स्तर बिघडू लागल्यामुळे मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात कठोर उपाययोजना सुरू केल्या होत्या. बोरिवली पूर्व आणि भायखळा या भागातील हवेचा दर्जा खालावल्यामुळे या परिसरातील सर्व बांधकामांवर बंदी घालण्यात आली होती. या दोन्ही परिसरातील ७८ बांधकामांवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी घातल्यानंतर चारच दिवसात या भागातील हवेचा दर्जा सुधारला. त्यामुळे आता पालिकेने लगेच या भागांतील बांधकामावरील निर्बंध दूर केले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हे ही वाचा… महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प उभारण्याची गरज; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रस्ताव

भायखळ्यातील हवेचा निर्देशांक १२५ ते १४० च्या दरम्यान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आणखी दोन दिवस आढावा घेऊन या भागातील निर्बंध उठवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारी या दोन्ही भागातील बांधकामांवरील सरसकट निर्बंध हटवण्यात आले आहेत, असे असले तरी या भागातील ज्या बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसतील अशा बांधकाम प्रकल्पांवर मात्र निर्बंध लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वातावरणीय बदलांमुळे वायू प्रदूषणात वाढ आढळून आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होवून वायू प्रदूषण नियंत्रणात आल्याने पालिकेने आता ही बंदी उठवली आहे. अस असले तरी, यापुढेही मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर महानगरपालिकेची यंत्रणा अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणार आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आवश्यक ती सर्व कार्यवाही बांधकाम प्रकल्पांना, विकासकांना करावीच लागेल. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळून आले आणि वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता केली नाही तर अशा विशिष्ट बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, आवश्कतेनुसार त्या विशिष्ट बांधकाम प्रकल्पावर निर्बंध लादण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिला आहे.

हे ही वाचा… विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

दरम्यान, गोवंडी शिवाजी नगर येथील हवेचा दर्जाही गेल्या आठवड्यात खालावला होता. त्यामुळे हा परिसर सध्या निरिक्षणाखाली असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. राडारोड्याची अवैध वाहतूक, तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे या भागात सतत प्रदूषण वाढते आहे. यापूर्वीही अनेकदा शिवाजीनगरमधील हवेची वाईट ते अतिवाईट श्रेणीत नोंद झाली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पालिका मुख्यालयात पालिका अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेतली होती. त्यावेळी देवनार कचराभूमी येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली होती. तसेच कचराभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाची पूर्णत: विल्हेवाट लावून जमीन करण्यास किती कालावधी लागेल याबाबतही एमपीसीबीने पालिका प्रशासनाला विचारणा केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution in mumbai constructions in borivali byculla free of restrictions govandi and shivajinagar under supervision mumbai print news asj