मुंबई : मुंबईत मागील दोन तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेत साचलेली प्रदूषके वाहून नेण्यास मदत झाली. त्यामुळे मागील काही दिवस मुंबईच्या हवा गुणवत्तेत बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून कुलाबा आणि कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली तर इतर भागातील हवा देखील ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली.
संपूर्ण नोव्हेंबर महिना मुंबईकरांनी ‘वाईट’ हवा अनुभवल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीस हवेची गुणवत्ता थोडी सुधारली होती. मात्र, मुंबईवरील फेंगल चक्रीवादळच्या प्रभाव संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा मुंबईची हवा प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. समीर अॅपच्या नोंदीनुसार, गुरुवारी कुलाबा येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक सायंकाळी पाचच्या सुमारास २२५ इतका होता. तर, कांदिवली येथील हवा निर्देशांक २५४ इतका होता. तसेच शीव, पवई, शिवाजीनगर, शिवडी या परिसरात मध्यम हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे १२०, १२१, १९८, १४४ इतका होता. दरम्यान, मुंबईचे वाढते हवा प्रदूषण बघता मुंबईकरांनी मुखपट्टीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. वरळी, सीएसएमटी परिसरात प्रामुख्याने याचा वापर होताना दिसत आहे. गुरुवारी मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. यावेळी मुंबईचा सरासरी हवा निर्देशांक १३४ इतका होता. दरम्यान, ग्रीनपीस इंडियाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अहवालामध्ये मुंबईत नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण अधिक असल्याचे नमूद केले आहे. त्यात माझगाव, मालाड या परिसरांत प्रदुषकांचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.