दहीहंडीच्या दिवशी सेलिब्रेटींना आणून जास्तीत जास्त गर्दी खेचण्यात चढाओढ लावणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये सर्वात जास्त ध्वनीप्रदूषण कोण करणार यावरूनही जणू स्पर्धा लागली होती. या उलट पारंपरिक पद्धतीने गल्लीगल्लीत लहान प्रमाणावर साजऱ्या झालेल्या दहीहंडीमध्ये आवाजाची तीव्रता नव्हती. ‘आवाज फाऊंडेशन’ या संस्थेने विकसित केलेल्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांनी नोंदविलेल्या माहितीवरून हे दिसून आले आहे. दादर, वांद्रे येथील छोटय़ा स्तरावर सुरू असलेल्या दहिहंडी उत्सवात गुरुवारी फारसा गोंगाट नव्हता, असे निरीक्षण फाऊंडेशनच्या संस्थापक सुमायरा अब्दुलाली यांनी नोंदविले आहे.
नेमके याउलट चित्र राजकीय नेत्यांनी आयोजिलेल्या हंडीमध्ये दिसत होते. ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या नियमांनुसार निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल तर शांतता क्षेत्रात ५० डेसिबलची मर्यादा पाळावी लागते. पण, ढणाणणाऱ्या डीजेंमुळे मुंबईत वातावरण कर्णकर्कश झाले होते.
राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी जांबोरी मैदानात दहीहंडीचे आयोजन केले होते. या मैदानाच्या परिसरात अंबादेवीचे मंदिर असल्याने हा परिसर शांतता क्षेत्रात येतो. पण, आवाजाच्या मर्यादेचे नियम धाब्यावर बसविल्याने येथील आवाजाची पातळी ९६ डेसिबल्सवर पोहोचली होती. दादरमध्ये शिवसेनेने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवातही हेच चित्र होते. रानडे मार्गावर आयोजिलेल्या उत्सवाच्या ठिकाणापासून ६० फूट लांब परिसरातही डॉल्बीचा ढणढणाट नियमित पातळीपेक्षा कितीतरी जास्त होता. ठाण्यातील गोखले मार्ग, पाचपाखडी, तलावपाळी, रहेजा येथेही आवाजाची पातळी अधिक होती. डॉ. महेश बेडेकर यांनी घेतलेल्या नोंदींवरून आयोजकांनी सर्रास आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. यात सर्वात कडी कुणी केली असेल तर ‘नवनिर्माणा’चा झेंडा खांद्यावर घेतलेले मनसेचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी. दुपारी साडेबारा ते एक या काळात या ठिकाणी आवाजाची पातळी १०० डेसिबलची मर्यादा ओलांडून गेली होती. अनेक ठिकाणी पोलिस आवाजाच्या पातळीची नोंद घेत होते. मात्र  किती आयोजकांवर कारवाई होणार ते स्पष्ट झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    वेळ                     ठिकाण                           आवाजाची पातळी
   १२.३० ते १         घाटकोपर (राम कदम)            १०६ डेसिबल
  २.३० ते ३.३०      दादर (शिवसेना)                      ९७ डेसिबल
  ६.१० ते ६.३०      जांबोरी मैदान (सचिन अहिर)     ९६ डेसिबल
  ५ वाजता           गोखले मार्ग                            ७८ डेसिबल
  ५ वाजता          पाचपाखाडी (जितेंद्र आव्हाड)        ८८  डेसिबल
  ५ वाजता          तलावपाळी (राजन विचारे)          ८५  डेसिबल
  ३ वाजता          पांजरपोळ, देवनार                     ९०  डेसिबल
  ५ वाजता          मोहम्मद रावजी चाळ, दादर        १०६ डेसिबल