वर्दळीच्या ठिकाणचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय

मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आलेली ‘वायू’ (विंग ऑग्युमेंटेशन अ‍ॅण्ड प्युरिफाईंग युनिट) यंत्रणा यशस्वीपणे काम करीत असल्याने या यंत्रांची शहरातील संख्या वाढविण्यात येणार आहे. शीव, वांद्रे, घाटकोपर, मुलुंड, वरळी आदी ठिकाणी ही नवीन २० यंत्रे लावण्यात येणार आहेत. वर्दळीच्या ठिकाणी वाहनांचा धूर, धूळ यांमुळे हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ‘वायू’च्या माध्यमातून आणखी काही ठिकाणी मुंबईकरांना त्यातल्या त्यात शुद्ध हवा मिळणार आहे.

‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट’ (निरी), मुंबईची आयआयटी व ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी संयुक्तपणे राबविलेल्या प्रकल्पाअंतर्गत गेल्या वर्षी घाटकोपर, भांडुप, कलानगर, सायन येथील वाहनांची वर्दळ असलेल्या चौकांमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली होती. हवा प्रदूषित करणारे अत्यंत सूक्ष्म कण शोषून घेण्याचे काम ही यंत्रणा करते. त्याचा चांगला परिणाम दिसू लागल्याने शहराच्या इतरही भागात ही यंत्रणा कार्यरत करण्याचा विचार आहे.

दिल्लीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मदतीने ‘निरी’ ही यंत्रणा विविध ठिकाणी बसविणार आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक स्तरावर ही यंत्रणा प्रमुख वाहतूक बेटांवर बसविण्यात आली होती. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी ‘वायू’ हे यंत्र बनविले होते. दोन वर्षांपूर्वी संस्थेच्या प्रवेशद्वारावर हे यंत्र बसवून त्याचा अभ्यास करण्यात आला. त्या वेळी या परिसरातील हवेचे प्रदूषण ६० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ‘निरी’ कडून या यंत्रणेत बदल करून मुंबईच्या प्रमुख वाहतूक बेटांवर ही यंत्रे बसविण्यात आली.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या यंत्रणेच्या झालेल्या परिणामाचा अहवाल ‘निरी’ संस्थेतर्फे मार्च महिन्यात मंडळाला पाठविण्यात आला होता. घाटकोपरमध्ये दोन महिन्यांनंतर ३८ हजार मिलिग्रॅम, सायनमध्ये २० हजार मिलिग्रॅम, कलानगरमध्ये १९ हजार मिलिग्रॅम आणि भांडुपमध्ये १६ हजार मिलिग्रॅम एवढे दूषित कण जमा झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली होती. हवेतील सूक्ष्म प्रदूषित कण शोषून घेण्यास हे यंत्र यशस्वी झाल्याचे अहवालात निष्पन्न झाल्याने, आता या यंत्रांच्या संख्येत वाढ करण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बसविण्यात आलेली ही यंत्रणा पाच महिन्यांनंतर पावसाळ्यात चार महिने बंद ठेवण्यात आली होती. या महिन्यापासून ही यंत्रणा पुन्हा कार्यरत करण्यात आली आहे, अशी माहिती ‘निरी’चे संचालक राकेश कुमार यांनी दिली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने आणखी २० ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे, असे राकेश कुमार यांनी सांगितले.

Story img Loader