लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाली आहे. अनेक भागातील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली जात आहे. ‘समीर ॲप’नुसार बुधवारी मुंबईची हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी सायंकाळी ७२ इतका होता. मात्र, अजूनही काही ठराविक भागातील हवा ‘मध्यम’ श्रेणीत आहे. वांद्रे कुर्ला संकुल आणि शीव परिसरातील हवा बुधवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. अनेक भागात ‘समाधानकारक’ ते ‘चांगली’ हवा नोंदली जात आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. ‘समीर ॲप’च्या नोंदीनुसार बुधवारी वांद्रे कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक १०६ इतका होता. तसेच शीव येथे ११३ हवा निर्देशांक होता. वांद्रे कुर्ला संकुल परिसरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी आणि विकासकांमामुळे येथील हवा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत असल्याची शक्यता आहे. याआधी बऱ्याचदा वांद्रे कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या हवा निर्देशांकांत सुधारणा होत आहे. अनेक भागात ‘चांगल्या’ हवेची नोंद आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान ‘चांगले’, ५१-१०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१-२०० दरम्यान ‘मध्यम’, २०१-३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१-४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.
दरम्यान, नोव्हेंबर – डिसेंबर या कालावधीत मुंबईतील हवेच्या दर्जाची ‘वाईट’ श्रेणीत नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. काही भागातील बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच महानगरपालिका प्रशासनाने हवेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तसेच विविध मार्गदर्शक तत्वेही लागू केली.
कुलाबा, मुलुंड येथील हवा ‘चांगली’
काही महिन्यांपूर्वी कुलाबा आणि इतर काही भागात सातत्याने वाईट हवा नोंदली जात होती. त्यानंतर पालिकेने केलेले विवध उपाय आणि वातावरणातील बदलामुळे येथील हवेत आता सुधारणा झाली आहे. बुधवारी कुलाबा येथील हवा निर्देशांक ५०, तर मुलुंड येथील ३६, मालाड ५० आणि कांदिवली येथे ४० इतका हवा निर्देशांक होता.
इतर भागातील हवा निर्देशांक
बोरिवली – ८१
चेंबूर- ८३
घाटकोपर- ६८
माझगाव – ५४
शिवाजी नगर, गोवंडी – ९६
वरळी -७९
भायखळा – ५१
पवई – ७१
विलेपार्ले – ८२