मुंबई : पावसामुळे मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट झाली असून हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा दर्जा शनिवारी ‘चांगला’ नोंदवला गेला. हा दर्जा रविवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबईच्या कमाल तापमानाचा पाराही खाली उतरला आहे. मात्र वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाडा कायम आहे.
हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या समीर ॲपच्या नोंदीनुसार मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी सायंकाळी ४५ इतका होता. गेले काही दिवस मुंबईच्या हवेत सुधारणा झालेली आहे. मुंबईच्या सर्व केंद्रांवर समीर ॲपच्या नोंदीनुसार हवा चांगली होती. पीएम २.५, पीएम १०, ओझोन यांचा स्तर समाधानकारक नोंदला गेला. दरम्यान, रविवारीही अशीच स्थिती असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
वांद्रे – कुर्ला संकुल, मालाड, वरळी, कुलाबा या भागातील हवेची कायम मध्यम किंवा अतिवाईट अशी नोंद होते. मात्र या भागात शनिवारी हवा निर्देशांक अनुक्रमे ६५, २३,४०, २९ इतका नोंदला गेला. दरम्यान, पावसामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी दिवसा उन्हाचा चटका आणि सांयकाळी काहीसा गारवा असे वातावरण सध्या मुंबईत आहे. ढगाळ वातावरणामुळे आणखी एक ते दोन दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाडा सहन करावा लागेल. तसेच सायंकाळी किंवा रात्री पाऊस पडण्याची शक्यता असून त्यावेळी वातावरणात काहीसा गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पूर्व – मध्य अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तसेच चक्राकार वाऱ्यांची स्थितीही निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पाऊस कायम राहील. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात रविवार, सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील अन्य भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.