मुंबई: करोना संसर्ग नियंत्रणात येताच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून मुंबई विमानतळावर एकाच दिवसांत येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या तब्बल एक लाख ३० हजार ३७४ प्रवाशांची नोंद झाली आहे. ही नोंद १७ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. करोनाकाळानंतर आतापर्यंतची मुंबई विमानतळावरील ही सर्वाधिक प्रवासी संख्या असल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली.
मुंबई विमानतळावरून १७ सप्टेंबर रोजी सुमारे ९५,०८० अंतराष्ट्रीय, तर ३५,२९४ देशांतर्गत प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून या दिवशी एकूण ८३९ उड्डाणे झाली. इंडिगो विस्तारा आणि गो फर्स्टने देशांतर्गत मार्गांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक केली. देशांतर्गत दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नई या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी आले आणि गेले. तसेच मुंबई विमानतळावरून दुबई, अबू धाबी आणि सिंगापूर येथे सर्वाधिक प्रवासी गेले आणि येथून सर्वाधिक प्रवासीही मुंबईत आले. मुंबई विमानतळावर १८ सप्टेंबर रोजी पुन्हा एक लाख ३० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली. त्यापैकी सुमारे ९८ हजार प्रवाशांनी देशांतर्गत, तर सुमारे ३२ हजार प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवास केला. २१ मे २०२२ रोजी एक लाख २३ हजार प्रवाशांची मुंबई विमानतळावर नोंद झाली होती.