अवयव प्रत्यारोपणप्रकरणी मागणी
अवयवदानाची चळवळ रुजू लागल्यामुळे ‘ब्रेन डेड’ रुग्णांचे अवयवदान करण्यास नातेवाईक पुढे येऊ लागले आहेत. देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असून मूत्रपिंड, यकृत व हृदय वेळेत पोहोचण्यासाठी विमान सेवा तत्काळ उपलब्ध होणे नितांत गरजेचे आहे. दुर्दैवाने रुग्ण व रुग्णालयांच्या या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवत विमान सेवांच्या ऑपरेटरांकडून अवाचेसव्वा दर आकारले जात असून याला आळा घालण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे केली आहे.
औरंगाबाद येथे १३ जानेवारी रोजी राम या ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या नातेवाईकांनी हृदय देण्याची तयारी दाखवली होती. चेन्नई येथील एका रुग्णालयाचे डॉक्टर मुंबईत दाखलही झाले, परंतु विमान सेवेच्या ऑपरेटरने २२ लाख रुपयांची मागणी केली. दराबाबत वाटाघाटीत सहा तास गेले आणि अखेर एका हृदयाचा मृत्यू झाला. याबाबत अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नसले तरी भूज येथे काही दिवसांपूर्वी एका ब्रेन डेड महिलेचे अवयव काढण्यासाठी गेलेल्या मुंबईतील डॉक्टरांनाही असाच अनुभव आला. एकीकडे ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान करणाऱ्या नातेवाईकांचे मोठे मन असताना दुसरीकडे अमूल्य मनवी अवयवाच्या मूल्याचा बाजार मांडणारे खासगी विमान सेवा ऑपरेटरांच्या मनमानीला चाप लागला पाहिजे, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘लोकसत्ता’ सांगितले.
याप्रकरणी त्यांनी २० जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपरमुख्य सचिव मेधा गाडगीळ यांना पाठविलेल्या पत्रात गेल्या महिन्यातील काही घटनांमध्ये विमान कंपन्यांचे सहकार्य न लाभल्यामुळे ब्रेन डेड रुग्णांचे अवयव रुग्णांना मिळू शकले नसल्याचे नमूद केले आहे. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी ब्रेन डेड रुग्णांचे अवयव एका शहरातून अथवा राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा शहरात नेण्यासाठी अत्यल्प दरात विमान सेवा उपलब्ध व्हावी तसेच सदरची विमानसेवा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे बंधन संबंधित विमान कंपन्यांवर घालावे आणि ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी विमान उड्डाणाची किंवा उतरविण्याची सोय नाही अशा ठिकाणी ही सोय उपलब्ध करून देण्यासाठी ‘एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया’कडे पाठपुरावा करण्याची शिफारस केली आहे. तसेच एखाद्या व्हीआयपीने चार्टर विमानाचे आरक्षण केले असले तरी अवयव मिळाल्यास व्हीआयपीचे आरक्षण रद्द करून अवयव नेण्यासाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विमानसेवांच्या मनमानी दराला चाप लावा!
औरंगाबाद येथे १३ जानेवारी रोजी राम या ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या नातेवाईकांनी हृदय देण्याची तयारी दाखवली होती.
Written by संदीप आचार्य
Updated:
First published on: 23-01-2016 at 00:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aircraft transportation rates increase