मुंबईत एका २५ वर्षीय एअरहोस्टेसची हत्या करण्यात आली आहे. या एअरहोस्टेसचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये आढळला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. धारदार शस्त्राने गळा चिरुन या एअरहोस्टेसची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणात सोसायटीच्या हाऊसकिपरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबईत कुठे घडली ही घटना?
मुंबईतल्या मरोळ परिसरातील एका आलिशान गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत २५ वर्षीय हवाई सुंदरीची हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मारेकऱ्याने धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली. पवई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
रुपल ओग्रे या एअरहोस्टेसची हत्या
मरोळ परिसरातील के. मारवाह मार्गावरील एन.जी. कॉम्प्लेक्स सोसायटीतील सी विंगमधील सदनिका क्रमांक ३०६ मध्ये रूपल ओग्रे ही तरूणी मृतावस्थेत आढळली. ती प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरी होती. मुळची छत्तीसगडमधील रुपल एप्रिल २०२३ मध्ये नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
रुपल या सदनिकेत तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासह राहात होती. परंतु, दोघेही आठ दिवसांपूर्वी रायपूर येथील त्यांच्या गावी गेले होते.रविवारी तिचे कुटुंबीय दूरध्ववनीवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र ती दूरध्वनी उचलत नव्हती. कुटुंबीयांनी तिच्या काही मित्रांना याबाबत माहिती दिली, ते एन.जी. कॉम्प्लेक्स सोसायटीतील रुपलच्या घरी गेले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद होता. घरातून कोणीच प्रतिसाद देत नव्हते. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी रुपल घरामध्ये मृतावस्थेत आढळली.
पोलिसांनी काय सांगितलं?
“तिचा गळा धारदार शस्त्राने चिरला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी, डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबाबत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी सकाळी तिचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यामुळे दुपारी तिची हत्या झाली असावी, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. रूपलच्या सदनिकेत कोण आले होते, हे जाणून घेण्यासाठी पोलीस सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करीत आहेत. स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे अधिकारीही समांतर तपास करीत आहेत.