आगाऊ आरक्षण केल्यास घसघशीत सूट देण्याचा फण्डा आता विमान कंपन्या वरचेवर वापरू लागल्या आहेत. स्पाइस जेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी ३० ते ९० दिवस आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी होळीच्या निमित्ताने ६० टक्के सूट दिली आहे. बाजारात वाढणाऱ्या या स्पर्धेचा अंदाज घेत जेट एअरवेजनेही ‘होली है’ म्हणत तिकिटांवर सूट देण्याचा रंग उधळला आहे. उन्हाळी सुट्टय़ांमध्ये बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या घसघशीत सवलतीचा चांगलाच फायदा होणार आहे.
२५ सप्टेंबपर्यंतच्या आपल्या तिकिटांच्या आरक्षणांवर जेट एअरवेजने ही सवलत देऊ केली आहे. या सवलतीमुळे लांब पल्ल्याचा विमानप्रवास आता अधिक स्वस्त होणार आहे. सध्या स्पाइस जेटचे सर्वात स्वस्त तिकीट १९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे एअर इंडियानेही पुढील ६० दिवसांसाठी दिल्ली-मुंबई विमानप्रवास ३८८१ रुपयांमध्ये देऊ केला आहे. होळीच्या निमित्ताने विमानकंपन्यांनी ही सवलत देण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबई येथील प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे, असे मेक माय ट्रिप या संकेतस्थळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मगाव यांनी सांगितले.

Story img Loader