मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती वर्दळ कमी करण्यासाठी, तसेच कल्याण – नवी मुंबई परस्परांना जोडण्यासाठी कळवा आणि ऐरोलीदरम्यान उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या प्रकल्पाआड आलेल्या झोपडपट्टीमधील १०८० पैकी ८७१ प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरास नकार दिला आहे. त्यामुळे ऐरोली – कळवा उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याचे स्वप्न धूसर बनले आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी भूसंपादनास विरोध केल्यामुळे प्रकल्प रखडल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) अधिकाऱ्यांनी दिली. या वादात आता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही उडी घेतली आहे. हा उन्नत मार्ग डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा एमआरव्हीसीचा मानस होता. परंतु आता हा मुहूर्त हुकण्याचीच चिन्हे आहेत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे – पनवेल ट्रान्स हार्बर सेवा सुरू करण्यात आली आहे. कल्याणहून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल पकडण्यासाठी ठाणे स्थानकात यावे लागते. त्यामुळे ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. प्रवाशांची वाढती वर्दळ कमी करण्यासाठी व कल्याण रेल्वेमार्ग नवी मुंबईला जोडण्यासाठी कळवा आणि ऐरोलीदरम्यान उन्नत रेल्वे मार्ग उभारण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला होता. डिसेंबर २०१६ मध्ये एमयूटीपी ३ योजनेला मंजुरी मिळाली. मात्र मार्गिकेच्या कामाला २०१८ पासून सुरुवात झाली. परंतु मार्गिकेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
मुकुंद आरयूबी, पारसिक बोगदा आणि कळव्याजवळच १०८० झोपडीधारक असून ते प्रकल्पाआड येत आहेत. त्यामुळे भांईंदरपाडा येथील एमएमआरडीएच्या जागेत त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १०८० पैकी २०९ झोपडीधारकांची पात्रता पडताळणी करण्यात आली. त्यांनी पुनर्वसनास होकारही दिला. मात्र स्थानिकांनी भूसंपादन आणि पुनर्वसनास केलेल्या विरोधामुळे ८७१ जणांची पात्रता पडताळणी रखडली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकल्प तीन वर्षांत म्हणजेच डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटल्यानंतर आणि मोकळी जमीन उपलब्ध झाल्यानंतरच उन्नत रेल्वे मार्गिका पूर्ण होईल. त्यासाठी तीन वर्षे लागतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
प्रकल्प खर्च वाढला
ऐरोली – कळवा उन्नत मार्गिका चार किलोमीटर लांबीची असून त्यासाठी ४७६ कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र प्रकल्प खर्च ५१९ कोटी ५६ लाख रुपयांवर पोहोचला आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण येथून थेट लोकलने कळवामार्गे ऐरोली, वाशी, पनवेलला जाणे शक्य होईल. त्यासाठी उन्नत मार्ग कळवा स्थानकाजवळ मुख्य मार्गाला जोडण्यात येणार आहे. कल्याण व्हाया कळवा ऐरोलीसाठीही दर दहा ते पंधरा मिनिटांनी लोकल उपलब्ध होऊ शकणार आहे.