मुंबई : तस्करांना विमानतळामधून सोने बाहेर काढून देण्यासाठी विमानतळ कर्मचारीच मदत करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याबदल्यात कर्मचारी तस्करांकडून १५ टक्के कमिशन घेत होते, असे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) तपासात उघड झाले. याप्रकरणी डीआरआयने नुकतीच सहा जणांना अटक केली असून त्यात तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १० कोटी रुपये आहे.
विमातळावर कामाला असलेला रोहन चव्हाण (२०) सोने तस्करी करणाऱ्या टोळीला मदत करीत असल्याचा डीआरआयला संशय होता. डीआरआयच्या मुंबई विभागीय कार्यालयाने गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्याचाच एक भाग म्हणून चव्हाणचा माग घेण्यात आला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अंधेरी पूर्व येथील सहार गावपर्यंत चव्हाणचा पाठलाग केला. त्यावेळी तो अर्शद शेख (२६), अरबाज तांबोळी (२१) आणि अनस पटेल (२६) यांना भेटल्याचे निदर्शनास आले. त्या माहितीच्या आधारे सर्वांना ताब्यात घेण्यात आले. रोहन चव्हाण सोन्याच्या १९ कॅप्सूल देण्यासाठी तेथे गेला होता. त्या कॅप्सूलमध्ये मेण भरलेले होते. त्यात सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान अनिल चव्हाण (२९) आणि विवेक रेवळे (३६) यांची नावे डीआरआयला समजली. अनिल व रेवळे सोने घेऊन तेथे येणार असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. त्या माहितीच्या आधारे डीआरआयने पुन्हा सापळा रचला. त्यात रेवळे व अनिल यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडूनही सोन्याच्या १२ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. त्यातही मेणात सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी ९५ लाख रुपये आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणुकीला परवानगी, पुणे पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती
हेही वाचा – महिला पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन, बदलापूर प्रकरणी राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
आरोपी सराईत टोळीशी संबंधित आहेत. विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ते तस्करीचे सोने विमातळाबाहेर काढायचे. या टोळीतील इतर साथीदारांची माहिती मिळाली आहे. आरोपींचे बँक खाते व मोबाइलची माहिती घेण्यात आली असून त्याद्वारे डीआरआय अधिक तपास करीत आहे. आरोपींचे मोबाइल पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडून आरोपींच्या बँक खात्यात झालेल्या व्यवहारांची माहिती घेण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोपी सोन्याची तस्करी करीत आहेत. तसेच आरोपींच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे. याप्रकरणी तपासात आरोपी कर्मचारी १५ टक्के कमिशन घेऊन विमानतळावरून सोने बाहेर काढत होते. याबाबत डीआरआय अधिक तपास करीत आहे.