मुंबई : शिवसेना आमदारांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीला विधानसभेतील पक्षाचे गटनेते अजय चौधरी आणि चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. यामुळे या दोन आमदारांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे.

इतर सर्व आमदारांना निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौधरी आणि फातर्पेकर यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हे दोन आमदार अस्वस्थ असल्याचे समजते. या दोन मतदारसंघांत विद्यामान आमदारांव्यतिरिक्त प्रबळ दावेदार असल्यामुळे या मतदारसंघाचा तिढा आता खुद्द उद्धव ठाकरे सोडवणार आहेत.गुरुवारी संध्याकाळी शिवसेना (ठाकरे) पक्षाने विद्यामान आमदारांची मातोश्री निवासस्थानी बैठक बोलवली होती. या बैठकीला आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.चेंबूरमध्येही विद्यामान आमदार प्रकाश फातर्पेकर असले तरी माजी नगरसेवक अनिल पाटणकर हेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांमधील तिढा सोडवण्यासाठीही  पक्षश्रेष्ठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे समजते.

हेही वाचा >>>भांडुपमधील महापालिका रुग्णालयातील प्रसूती दिव्यांच्या प्रकाशातच, महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

शिवडीत खबरदारी

शिवडी हा शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात विद्यामान आमदारांविरोधात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवडी मतदारसंघातील विद्यामान आमदार अजय चौधरी हे आतापर्यंत दोनदा निवडून आले आहेत. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांना विधानसभेच्या गटनेतेपदी नेमले होते. ठाकरे यांनी विश्वास दाखवल्यामुळे चौधरी यांना पुन्हा आमदारकी मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र गटनेते पदावरून चौधरी यांची आक्रमकता दिसली नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीत शिवडीमध्ये मताधिक्य घटल्यामुळे चौधरी यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी आहे का याबाबतही चाचपणी सुरू आहे. त्यातही चौधरी जिथे राहतात त्याच लालबाग-परळमधील मते कमालीची घटली होती. लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने लोकसभा समन्वयक म्हणून लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे साळवी हे यंदा उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. तर याच मतदारसंघातून यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.