लोकसत्ता क्रीडा प्रतिनिधी
मुंबई : ‘‘क्रिकेटपटू म्हणून मला लोक ओळखत असले तरी, अजिंक्य रहाणे हा चांगला माणूस म्हणून लोकांनी ओळखणे, हे माझ्यासाठी मोठे यश आहे,’ असे मत भारताचा प्रथितयश क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने बुधवारी ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात व्यक्त केले. संयमी क्रिकेटपटू, गुणी फलंदाज आणि चाणाक्ष कर्णधार अशा तिन्ही आघाडय़ांवर यशस्वी असलेल्या अजिंक्यने जाहिरातींमधून कोटय़वधी रुपये मिळवण्यापेक्षाही आपण माणूस म्हणून काय देऊ शकतो, हा विचार महत्त्वाचा आहे, असेही नमूद केले.
केसरी टूर्स सहप्रायोजित या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर लागू बंधू होते, तर बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड हे होते. क्रिकेटप्रेमी ज्येष्ठ रंगकर्मी विनय येडेकर आणि ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी अजिंक्यशी संवाद साधला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या संवादात अजिंक्यच्या अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंचा उलगडा झाला.
ऑस्ट्रेलियातील दिग्विजयी दौरा, त्यासाठी टप्प्याटप्प्यावर केलेल्या आव्हानांचा सामना, शालेय जीवनापासून सुरू झालेली कारकीर्द, रणजी क्रिकेटचे दिवस, आयपीएलमधील अनुभव, कारकीर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबीयांची मिळणारी साथ अशा विविध विषयांवर अजिंक्य व्यक्त झाला.यशापयशापेक्षाही स्वत:वर विश्वास ठेवून पुढे जात राहणे आणि निकालांपेक्षा प्रक्रियेवर विसंबून राहणे याला आपण अधिक महत्त्व देतो, असे अजिंक्य म्हणाला. शेतीविषयी आपल्या कुटुंबातूनच प्रेरणा मिळाली. शेतकऱ्यांचे दु:ख पाहून आपण कासावीस झालो. त्यामुळेच शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले, असेही त्याने सांगितले. रंगभूमी, कॉर्पोरेट, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सहप्रायोजक : केसरी टुर्स पॉवर्ड बाय : लागू बंधू
बँकिंग पार्टनर : ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड