मागील अनेक दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासह पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी संपावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. दरम्यान, नेहरू सेंटर येथे याबाबत महत्त्वाची बैठक सुरू आहे.
एसटी संपाला भाजपाने पूर्ण पाठिंबा देत या आंदोलनात आपले नेते उतरवले आहेत. भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात ठाण मांडून आहेत. त्यामुळे हे आंदोलन ताणलं गेल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे यावर महाविकासआघाडी सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘एसटी’ला शासनाकडून दिलासा ; ६०० कोटी रुपयांची मदत मिळणार
एसटी संपाबाबत बैठकीत काय चर्चा?
शरद पवार यांनी अनिल परब यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. यानंतर वरळीतील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत एसटीच्या विलिनीकरणासोबतच पगारवाढीवर चर्चा झाली. पवारांनी सरकारने उच्च न्यायालयाच्या समितीसमोर काय भूमिका मांडली पाहिजे यावरही सूचना केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.