राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर चांगलाच संताप व्यक्त केला. सभागृहात समोर कुणी बोलत असलं तरी काहीजण मागे अध्यक्षांकडे पाठ करून गप्पा मारतात, असंही अजित पवार यांनी सांगितलं. तसेच अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते याची आठवण करून देत त्यांनी आमदारांना शिस्त पाळण्यास सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा”

अजित पवार म्हणाले, “आम्ही आमदार झालो तेव्हा कॅबिनेट मंत्री समोर बसायचे, तर आम्ही पाठीमागे बसून त्यांच्याशी बोलायचो. बहुतांशवेळा त्यांना सभागृहात डिस्टर्बच करत नसायचो. आज एक पत्र आणून दिलं की १० मिनिटांनी पुन्हा दुसरं पत्र आणून देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. काही तरी शिस्त पाळा. सगळ्यांनीच नियमावलीचं पालन केलं पाहिजे.”

“अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते”

“क्रॉसिंग तर अजून कुणाला कळतच नाही. कुठे कोण उभं आहे, कुणीही क्रॉस करतं आणि काहीही करतं. अनेकदा सभागृहात समोर कुणीतरी बोलत असतं आणि इतरजण गप्पा मारत असतात. त्यांची पाठ अध्यक्षांकडे असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर अध्यक्षांना नमस्कार करायचा आणि मग बसायचं असतं. जाताना अध्यक्षांना नमस्कार करून मग जायचं असतं. नमस्कार करणं तर सोडूनच दिलंय,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“काहींना आमदार झालो म्हणजे सगळंच समजतं असं वाटतं, पण…”

“काही जणांना अजिबात तारतम्य राहिलेलं नाही. आपण आमदार झालो म्हणजे सगळंच आपल्याला समजतं असं वाटतं, पण अजूनही आम्हाला सगळं समजत नाही आणि ह्यांना कधी समजायला लागलं. याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे,” असंही पवारांनी नमूद केलं.

दरम्यान, अजित पवार यांनी राजकारणातील बदललेला काळ, परंपरा आणि सभागृहाचे नियम यावर बोलताना आता कुणीही येतं आणि अगदी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापर्यंत मजल जाते, असं निरिक्षण मांडलं. तसेच मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहू दे बाबा म्हणत टोला लगावला. यावेळी त्यांनी ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधीमंडळात आल्याचे अनुभवही सांगितले.

“…अरे मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा”

अजित पवार म्हणाले, “आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीने आवाज काढतो, टवाळी करतो असं त्यांना वाटत असेन तर त्यांना काय वाटेल. त्यामुळे आमचे चारही प्रमुख पक्ष, इतर राजकीय पक्ष, अपक्ष सदस्य अशा सर्वांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. सुरुवातीला आम्ही आमदार झालो तेव्हा मधुकर चौधरी होते. त्यावेळी त्यांचा तिथं इतका व्यवस्थित दरारा असायचा की ते उभे असतील तर आम्ही दरवाजात उभे राहायचो. दरवाजा ओलांडायचो नाही.”

हेही वाचा : अजित पवार यांनी बालेकिल्ल्यात ‘अक्कल’ काढली, नारायण राणेंकडून घणाघाती प्रत्युत्तर, म्हणाले…

“आता कुणीही येतं आणि अगदी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापर्यंत मजल चालली आहे. मी त्या दिवशी एकाला सांगितलं अरे मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा. तुला १४५-२०० आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar angry on mla behavior in maharashtra assembly session pbs