राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ४ दिवसात राज्य विकतील या टीकेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर दिलंय. “कोणी विधान परिषदेचा सदस्य बोलतो की ४ दिवसात राज्य विकतील, पण राज्य कसं चालवायचं हे आम्हाला कळतं. मी ३० वर्षापासून आणि बाळासाहेब ३५ वर्षापासून काम करत आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “राज्य कशा पद्धतीने चालवायचं असतं आम्हालाही कळतं. मी ३० वर्ष काम करतोय, बाळासाहेब ३५ वर्षे काम करत आहेत. कोणी विधानपरिषदेचा सदस्य बोलतो की ४ दिवसात राज्य विकतील, राज्य कसं चालवायचं हे आम्हाला कळतं.”

“बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटून घेऊन गेलो असतो, पण…”

“बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटून घेऊन गेलो असतो, पण लोकशाहीची पायमल्ली होता कामा नये. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर आम्ही राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. लवकरच महाविकास आघाडीतील नेते याबाबत राज्यपालांना भेटून अधिक सविस्तर चर्चा करू. चर्चेतून तोडगा निघतो म्हणून भेट घेणार आहोत,” असंही पवारांनी सांगितलं.

“अधिवेशनाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती राहिली”

अजित पवार म्हणाले, “या अधिवेशनाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती राहिली. सुरुवातीला अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन खालच्या आणि वरच्या सभागृहाची पाहणी केली. त्यांचं अधिवेशनावर फार बारकाईने लक्ष होतं. त्यांनी त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या. या काळात ज्या दोन कॅबिनेट झाल्या त्यालाही ते व्हीसीद्वारे हजर होते.

“…पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत”

“मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावं अशी आमची सर्वांचीच इच्छा होती. मी पण सुरुवातीला चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टँपवर लिहून देऊ का असा दावा केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो. पण मुख्यमंत्री आले नाहीत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…अरे मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा”, अजित पवार यांची अधिवेशनात राजकीय टोलेबाजी

“…म्हणून मी आणि बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना अधिवेशनात येऊ नका असं सांगितलं”

“शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते, पण करोनाचे रुग्ण वाढायला लागले म्हणून मी आणि बाळासाहेब यांनी त्यांना अधिवेशनात येऊ नका असं सांगितलं. त्यांची तब्येत पूर्ण सुधारावी यासाठी आपण प्रार्थना करूया,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar answer gopichand padalkar over allegations amid maharashtra assembly session pbs