राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच शरद पवारांच्या या राजीनाम्याच्या निर्णयाला विरोध केला. तसेच त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली. मात्र, शरद पवार राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही, तर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं की, शरद पवारांनी तुम्हाला राष्ट्रवादीचं अध्यक्ष केलं, तर होणार का? यावर अजित पवारांनी स्पष्ट शब्दात त्यांची भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले, “अरे बाबा अध्यक्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. मला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं, तरी मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. मी त्या पदावर अजिबात काम करू शकत नाही. तसा विचार करण्याचाही प्रश्न उपस्थित होत नाही.”
दरम्यान, शरद पवार यांनी वाय बी सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, “राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर मला खात्री होती की तुम्ही मला होय म्हणाले नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही” असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
हेही वाचा : “शरद पवार आणि अजित पवार हे दिसायला वेगवेगळे, पण…”, भाजपा आमदाराचं सूचक वक्तव्य
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
वाय बी सेंटरबाहेर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “असा निर्णय घेण्याआधी सहकार्यांशी चर्चा करणं आवश्यक असतं, पण मला खात्री होती, तुम्ही मला ‘होय’ म्हणाले नसता. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती, पण त्यावेळी मी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यामागे माझा हेतू काय होता? हे मी तुम्हाला सांगितलं आहे.”
“मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी इथे आले आहेत. उद्या माझ्याशी त्यांना बोलायचंय. उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन… येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढंच याठिकाणी सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, याची खात्री देतो,” असंही शरद पवार यावेळी म्हणाले.