शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य मोठे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान देण्याचे काम केले आहे. मी सुद्धा अनेक वेळा त्यांची व्याख्याने ऐकली आहेत, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेले मत त्यांचे वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांच्या मताचे समर्थन करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याला जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला द्यायचा, हा राज्य सरकारचा अधिकार आहे. पक्षामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी मते असतात. त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांचे या संदर्भात वेगळे मत आहे. पण बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य मोठे आहे. ते एक वयस्कर व्यक्ती आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान देण्याचे काम त्यांनी केले आहे. मी सुद्धा गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि इतर वेळी त्यांची व्याख्याने ऐकली आहेत.
येत्या १९ ऑगस्ट रोजी बाबासाहेब पुरंदरे यांना राजभवन येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यास विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आटोपशीरपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Story img Loader