राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. “शिंदे-फडणवीस सरकार पोलीस अधिकाऱ्यांना आणि शिपायांना कार्यकर्ते असल्यासारखं राबवतात,” असा आरोप अजित पवारांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले, “राज्यात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. धाराशिवमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. पुणे, नाशिक आणि अन्य ठिकाणी गुंड प्रवृत्तीची लोक वाहने फोडतात. कोयता गँगही अधूनमधून डोक वर काढते. दौंडमध्येही पती-पत्नीने आत्महत्या केली. या घटना सातत्याने घडत असून सरकार कमी पडत आहे. पोलीस यंत्रणा उत्तम आहे. पण, त्यांना मोकळीक मिळत नाही. त्यात हस्तक्षेप वाढत आहेत.”
हेही वाचा : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात केली? मुंबई पोलीस म्हणाले…
“महाराष्ट्राची देशात आणि जगात बदनामी होत आहे”
“शिंदे-फडणवीस सरकार पोलीस अधिकाऱ्यांना आणि शिपायांना कार्यकर्ते असल्यासारखं राबवतात. ही महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभा देणारी बाब नाही. त्यामुळे महाराष्ट्राची देशात आणि जगात बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा जाणीवपूर्वक बिघडवला जातोय,” असेही अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “नरहरी झिरवळ बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतात, पण…”, अजित पवारांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला
“…तर मी तुमचं कौतुक करेल”
“धावत्या लोकलमध्ये विद्यार्थींनीबरोबर अत्याचाराची घटना घडली. या घटना पुरोगामी महाराष्ट्राला छेद देणाऱ्या आहेत. एकनाथ शिंदेंना बोललं तर, ते म्हणतात, ‘तुम्ही माझ्यावर फार टीका करता.’ अहो, तुम्ही नुसतीच दाडी कुरवाळत बसता. मग टीका करू नाहीतर काय करू. तुम्ही काम करा. मी तुमचं कौतुक करेल,” असेही अजित पवारांनी म्हटलं.